मोठया प्रमाणात भ्रष्टाचार आणि नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे मनपा प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर येतो आहे. अनेक बेकायदेशीर प्रकार पाहता याला वाली कोण आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे मनपाला आता एक सिंघम अधिकारी हवा असल्याची चर्चा सुरू आहे.
मनपा प्रशासनाचा आंधळा कारभार आणि अनेक गैरव्यवहार घडत असतानाही काही नगरसेवक आणि अधिकारी यांच्या मिलीभगत मुळे करण्यात आलेली विकास कामे निकृष्ट झाली आहेत. वर्षात दोन वेळा एकाच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत तरी देखील सर्व प्रकाराकडे डोळेझाक करून मनमानी कारभार सुरू आहे.
विकासाची गंगा आणण्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानली जात आहे. तर काही अधिकारी नगरसेवकांना धरून अनेक निधींची केवळ ओरबाड करत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक गैरप्रकारात अनेक अधिकारी गुंतले आहेत. तर यासंबंधी वरिष्ट अधिकारी ही आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळेच अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून मनपात पारदर्शकता आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच मनपाला एका सिंघम अधिकाऱ्याची गरज आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार आणि नगर विकास खाते याकडे लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.