१९११ साली स्थापन झालेले हे बेळगाव शहरातील एक जुने मंडळ आहे. अनेक प्रकारे विधायक कार्यात सहभागी घेऊन या मंडळाची वाटचाल सुरू आहे. या मंडळाने आपल्या कार्यातून इतर मडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
पर्यावरण प्रदूषण आणि निसर्गावर होणारा घातक रंगांचा परिणाम याचा सारासार विचार करून या मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीला फाटा देऊन मातीची मूर्ती बसवण्यावर भर दिला आहे. श्री मूर्तीचे आगमन असो किंव्हा विसर्जन डॉल्बी सारख्या कानांचे पडदे फाडणाऱ्या वाद्यांना मंडळाने तिलांजली देऊन टाकली आहे. गल्लीतील महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या साथीने संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम हे मंडळ राबवत आले आहे.
रांगोळी ही कला जपण्यासाठी तरुण मुली व महिलांना रांगोळीची प्रात्यक्षिके दाखवणे, लहान मुलांना अक्षर सुधारण्यासाठी अक्षर लेखन आणि चित्रकला स्पर्धा घेणे, निबंध लेखन स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना आपले विचार व्यक्त करायला लावणे, लहान वयात व्यायामाचे महत्व समजावून सांगण्यासाठी सायकल चालवण्यासारख्या विविध स्पर्धा भरवणे, वयोवृद्ध लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करणे असे उपक्रम या मंडळाने राबवले आहेत.
सर्व जाती धर्म आणि समाजाचे लोक एकत्र यावेत यासाठी महाप्रसाद आयोजन, स्वच्छतेला महत्व देणे शहरातील विविध आश्रम मध्ये जाऊन तेथील निराधार मुलांसमवेत भोजन करणे हे उपक्रम मंडळ राबवत आहे. मल खांब आणि दोर खांब सारख्या स्पर्धा भरवणे तसेच खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे हे काम मंडळ सतत करत आले आहे.
लहान मुले आणि गल्लीतील नागरिकांसाठी प्रेक्षणीय स्थळी सहलींचे आयोजन, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा भरवून संस्कृतीचे जतन , युवक महिला आणि मुलींना व्यासपीठ अशा वेगवेगळ्या टप्प्यावर या मंडळाने विधायकता जपली आहे.फक्त गणेशोत्सव काळात कार्य न करता कोजागिरी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी, हादगा असे कार्यक्रम आयोजित करून एकसंघ राहण्याचा प्रयत्न गोंधळी गल्लीतील हे मंडळ करत असते.