काटकसरीचा मूलमंत्र जपत विधायक काम करणारे मंडळ म्हणून या मंडळाने आपली ओळख निर्माण केली असून नुकतेच हे मंडळ महाविजेताही ठरले आहे.अनेक विधायक कार्यांच्या माध्यमातून या मंडळाने सामाजिक हिताची जोपासना केली आहे.याबद्दल हे मंडळ अनेक पुरस्कारांचे मानकरीही ठरले आहे.माळी ही गल्ली जरी विस्ताराने लहान असली तरी या गणेश मंडळाचे कार्य मोठे आहे म्हणून अनेक बक्षिसे त्यांनी मिळवली आहेत म्हणून हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.
बालवाडीच्या मुलांना खुर्च्या वाटण्यापासून या मंडळाच्या कामाला सुरुवात होते.उत्सव काळात फळांचे वाटप, पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करणे, कमी उंचीची मूर्ती बसविण्यात येणे, शहिद जवानांप्रति आदर भाव व्यक्त करणे, भजन आणि पारंपारिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढणे आणि संपूर्ण गल्लीतील महिला, युवक, मुली यांच्या साथीने पूर्ण उत्सवात एकात्मतेचे दर्शन घडवण्यात या मंडळाने पुढाकार घेतला आहे.
शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अडचणी जाणून घेऊन मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ व ११ मधील विद्यार्थ्यांना हे मंडळ सातत्याने मदत करत आले आहे. समाजाची घाण उचलणाऱ्या स्वच्छता कर्मचारी वर्गाचा सन्मान केला आहे.खतालवली दर्गा येथील गरजू महिलांना ताट, वाट्या, ग्लास या साहित्याचे वितरण करून सामाजिक बांधीलकीही जपली आहे.
अनाथ मुले, पोस्टमन, शांताई वृद्धाश्रमाच्या रद्दीतून बुध्दिकडे या उपक्रमास मदत, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिर,सर्प मित्रांना बोलावून साप पकडणे व इतर गैरसमज याबद्दल मार्गदर्शन अशी कामे या मंडळाने केली आहेत.
या मंडळाने विविध भागाचा अभ्यास दौरा आयोजित करून गल्लीतील महिला व युवकांना चौफेर ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
महाप्रसादाचे आयोजन हे मंडळ करते. याचबरोबरीने देखावे आणि संदेशांच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम ही तरुण पिढी करत आहे. विधायक कामांना स्वतःपासून सुरुवात करून आदर्श निर्माण करण्याचे काम हे मंडळ करत आहे.