हे मंडळ यंदा आपली सुवर्ण महोत्सवी वाटचाल करत असून भालचंद्र काळू गिंडे यांच्या अध्यक्षतेखाली यंदा मंडळ काम करत आहे. यावर्षी खास सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाने आपला आगमन सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा केला आहे.
सर्व धर्मियांना एकत्र घेऊन मंडळाची वाटचाल सुरू आहे. यावर्षी आगमन सोहळ्यात मुस्लिम युवक आनंदाने सहभागी झाले आणि या मंडळाचे महत्व वाढले आहे.हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.
यावर्षी गंगम्मा चिकुंबी मठात अन्नदान, गोरगरीब मुलांसाठी सहाय्यता, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, गल्लीतील आजी व माजी कार्यकर्ते, पंच मंडळी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेंच गणहोम व महाप्रसाद वितरण ही कामे करतानाच अनेक लोकहिताची कामे मंडळ राबवणार आहे.
मागील ५० वर्षीय काळात या मंडळाने आपल्या पद्धतीने विधायक कामे करून आपली वेगळी छाप पाडली आहे. पूर्वी हे मंडळ संवेदनशील मानले जात होते. धार्मिक शक्तींचा काही त्रासही झाला पण कालांतराने सर्व धर्मियांना एकत्र घेऊन मंडळाने विधायकतेची वाट चालण्यास सुरुवात केली आहे. कोणतेही काम करताना ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन घेऊन या मंडळाचे कार्यकर्ते पुढे जातात त्यामुळे सर्व समावेशक मंडळ म्हणून नावलौकिक झाला आहे.
शैक्षणिक मदतीच्या बाबतीत या मंडळाने बरेचसे काम केले आहे. पोलीस अधिकारी वर्गाचा सत्कार, पोलीस व इतर खात्यात भरती होण्यासाठी लहान मुलांना प्रेरणा देणे, या अधिकारी व सरकारी नोकर वर्गाच्या उपस्थितीत कार्यक्रम ठेऊन त्यांची मार्गदर्शने उपलब्ध करून देणे ही कामे हे मंडळ करत आले आहे.
यापुढील काळातही लोकोपयोगी उपक्रम करून समाजाच्या कामात हातभार लावण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. गरीब, निराधार आणि गरजूंच्या हाकेला धावून जाण्याचे ध्येय मंडळाने डोळ्यासमोर ठेवले आहे.