पीएलडी बँकेची निवडणूक म्हणजे बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची ठरली. या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. इतकेच नाही तर सरकारच अडचणीत आले आहे. असे असताना ज्या प्रकारे म ए समितीच्या कार्यकर्त्यांची जी अवस्था झाली तीच आता राष्ट्रीय पक्षातील कार्यकर्त्यांची झाली आहे. जारकीहोळी कधी काँग्रेस तर कधी भाजप पक्षात उडी मारत असल्याने कार्यकर्ते मात्र कोणता झेंडा घेऊ हाती, अशा विवंचनेत आहेत.
पीएलडी बँकेचे राजकारण म्हणजे अक्का विरुद्ध जारकीहोळी असेच ठरले. यामध्ये आक्काने बाजी मारली खरी मात्र आपली प्रतिष्ठा टिकविण्यासाठी जारकीहोळी बंधुही कमी पडले नाहीत. त्यांनीही सरकारच पाडविण्याचा डाव घातला. रमेश जारकीहोळी यांनी सूड घेण्यासाठी भाजपची वाट धरली आणि सरकार अडचणीत आले. सरकार टिकविण्यासाठी मनधरणी आणि बरेच काही प्रयत्न सुरू आहेत.
या घडामोडी सुरू असताना आता मात्र कार्यकर्त्यांची चांगलीच पंचायत होऊन बसली आहे. एकीकडे कॉग्रेस पक्षांशी प्रामाणिक असणारे रमेश जारकीहोळी यांच्याबरोबर भाजपमध्ये जाणार का तर रमेश जारकीहोळी यांच्याशी सख्य असणारे इकडे आड तिकडे विहीर अशा बुचकळ्यात सापडले आहेत. त्यातच जारकीहोळी यांचे कोणाकडेच ठावठिकाणा लागत नसल्याने प्रतिष्ठेचा मुद्दा कार्यकर्त्यांच्या पत्त्यावर पडला आहे.
मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री यांनी जारकीहोळी बंधूची मनधरणी करण्यास यश मिळविले आहे. मात्र अजूनही यावर जारकीहोळी बंधू कोणता राजकीय बाण सरकारवर सोडणार आहे हा संशोधनाचा विषय आहे. सध्या तरी जारकीहोळी बंधूंची मनधरणी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. प्रतिष्ठेच्या राजकारणात कार्यकर्ते मात्र चांगलेच होरपळले आहेत.