विधायक गणेशोसव साजरा करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असते. तरीही अनेकजण पुढे येताना दिसत नाहीत पण सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन काम करणारे काही कार्यकर्तेही आपल्या कामाने लक्ष वेधून घेतात असेच एक नाव आहे भूपाल अत्तू यांचे.
गणेशोत्सव काळात अनेक गैरप्रकार घडतात. बऱ्याचदा या घटना घडून गेल्यावर समाजकंटकांचा शोध घेणे अवघड होते. यासाठी संवेदनशील भागातील गणेशोत्सव मंडळांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन अत्तू यांनी शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सोय केली आहे.
शहापूर पोलीस स्थानक परिसरातील नवी गल्ली, आळवण गल्ली व जेड गल्ली परिसरात भूपाल अत्तू यांनी आठ कॅमेरे बसवले आहेत.
शहापूर पोलिसांना या भागात कॅमेरे बसवायचे होते. पण यासाठी सरकारी खर्च वेळेत मिळणे अशक्य होते पण शहापुरचे सीपीआय जावेद मुशापुरी यांनी आवाहन करून शांतता राखण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पोलिसांची ही गरज आणि पैशांची अडचण भूपाल अत्तू यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी पुढाकार घेतला आहे.
कोणतीही वाईट घटना घडू नये आणि घडलीच तर ती कॅमेऱ्यात कैद व्हावी हा उद्देश ठेऊन काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे. प्रत्येक पोलीस स्थानक परिसरात असे कार्यकर्ते मिळाल्यास पोलिसांनाही मदत होणार आहे व जनताही सुरक्षित वातावरणात जगू शकेल.