राजकारणात जारकीहोळी बंधु माझ्या संपर्कात नाहीत मात्र सगळे जण भाजपात आले तर त्यांचे स्वागत आहे असे वक्तव्य राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सध्या काँग्रेस मध्ये मूळ काँग्रेसी कुणीही नाहीत वीरेंद्र पाटील यांचे सरकार पतन व्हायला वसंतराव पाटलांचा राजीनामाच कारणीभूत होता राज्याच्या राजकारणात बेळगावचा रोल महत्वपूर्ण आहे मात्र बेळगावचे कोणीही मुख्यमंत्री होणे कठीण आहे असेही ते म्हणाले.
बेळगावात 3 कोटी 40 लाख रूपये खर्चून उभारलेल्या कन्नड भवनाचे 15 सप्टेंबर रोजी उदघाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, कन्नड प्राधिकरण मनु बळीगार,पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पी एल डी बँक निवडणूक ठरली वादाचे कारण
पी एल डी नंतर बेळगावातील वाद बंगळूरुत शिफ्ट झाला असून जारकीहोळी बंधूनी काँग्रेस हाय कमांड कडे अनेक अटी ठेवल्या आहेत.बेळगावच्या पीएलडी (प्राथमिक भू-विकास) बॅंकेच्या राजकारणामुळे युती सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पी एल डी मध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांचा विजय झाला होता.
जारकीहोळी बंधूंनी पी एल डी बँक निवडणुकीत झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी 14 आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची तयारी चालविली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रमेश जारकीहोळी यांनी संपर्क साधला असून, सतीश जारकीहोळी यांनीही 15 दिवसांत काहीही घडू शकते, असे सांगितले आहे.
भाजप प्रवेशासाठी रमेश जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्यासमोर चार अटी ठेवल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद, सहा आमदारांना मंत्रिपद, पोटनिवडणुकीचा खर्च भाजपने करावा, मतदारसंघांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशा त्या अटी आहेत. डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेपास सतीश जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला असून, आमच्या जिल्ह्याचे राजकारण कसे करावयाचे आम्हाला चांगले माहीत आहे, पुढील 10 वर्षांत आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच बेळगाव मुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.