टिळकवाडी परिसरात पाणी पातळी घटून उन्हाळ्यात विहिरी आटण्याचे संकट होते. यावर पर्याय म्हणून वॅक्सिन डेपो आणि लेले मैदानावरील पाणी अडवून ते पाईप द्वारे बोरवेल मध्ये साठवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
माजी गटनेते नगरसेवक पंढरी परब यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प सुरू झाला आहे.
या प्रकल्पाची फक्त चर्चा सुरू होती. पंढरी परब यांनी पाणी पुरवठा मंडळ आणि मनपाकडे पाठपुरावा करून या कामासाठी पाच लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत.
दोन्ही मैदानावरील पाणी पावसात वाहून जाऊन गटारीत जाऊन वाया जाते. हे पाणी आता जवळच्या बोरवेल मध्ये साठवले जाईल आणि त्याचा उपयोग पाणी साथ वाढवण्यासाठी होणार आहे.यामुळे उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवण्याची गरज पडणार नाही.
एम जी रोड येथील रहिवासी अल्वारिस यांनी आपल्या बंगल्याच्या आवारातील पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रकल्प केला असून १२ महिने त्यांच्या विहिरीला पाणी असते. तसेच काही अपार्टमेंट च्या बिल्डरनीही असा प्रकल्प राबवून हातभार लावला आहे. सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात असे पाणी अडवून जिरवल्यास भविष्यात बेळगाव शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असे पंढरी परब यांनी सांगितले आहे.