भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून जी आय टी कॉलेज मधील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.राष्ट्रपतींनी सांबरा विमानतळ ते जी आय टी पर्यंत बेळगावच्या रस्त्यावरूनच प्रवास करावा अशी विनंती राष्ट्रपतीना करण्यात आली आहे.युवा वकील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांनी पत्र लिहून ही विनंती केली आहे.
बेळगाव सांबरा विमानतळ ते शहरातील जी आय टी पर्यंतचा रस्त्याचा दर्जा राष्ट्रपतींनी प्रवास करण्याच्या दर्जाचा नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केलंय त्यामुळं सांबरा ते जी आय टी पर्यंत राष्ट्रपती,राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टर प्रवास करतील याची तयारी जिल्हा प्रशासनाने चालवली आहे मात्र याबाबत अजून राष्ट्रपती भवनाकडून ग्रीन सिग्नल आल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.आदरणीय राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत देशाचे प्रथम नागरिक जर बेळगावच्या रस्त्यावरून प्रवास करू शकत नसतील तर इतरांनी या रस्त्यावरून कसा प्रवास करावा?असा प्रश्न उपस्थित करत बेळगावातील रस्त्यावरील धूळ ,पॅच वर्क आणि खड्डे याची जाणीव होईल म्हणून राष्ट्रपतींनी सांबरा ते बेळगाव प्रवास हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्यावरून करावा अशी विनंती पाटील यांनी पत्रात केली आहे.
बेळगाव शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाने 50 लाखांचा निधी मंजूर केलाय इतके दिवस आंदोलन झाली अनेकांनी जीव गमावले मात्र राष्ट्रपतींचा दौरा आहे म्हणून आता पॅच वर्कचे काम सूरु झालंय त्यामुळं सामान्य माणसाच्या जीवाची किंमत प्रशासनाला नाही का?शहरात एकूण 96 की मी लांब रस्ते असताना केवळ 25 की मी रस्ता ज्यात राष्ट्रपती येतील तेवढाच का दुरुस्त केला जात आहे असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केलाय.
दरवर्षी नवीन निधी खड्डे बुझवण्यासाठी मंजूर केला जातोय मात्र अवधी शिल्लक असताना रस्ते बनवलेल्या ठेकेदारा कडून हे रस्ते का दुरुस्त करून घेतले जात नाहीत असं देखील पाटील म्हणाले.