बेळगाव येथील पीएलडी बँकेचे राजकारण आणि त्यात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी ब्रदर्स यांच्यात पेटलेला संघर्ष संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. लक्ष्मी आक्कानी कोर्टात जाऊन निवडणूक उद्या लावून घेतली आहे, तर लक्ष्मी गटाचा विजय झाल्यास आम्ही विचार करू आणि आमचा निर्णय देऊ असे जारकीहोळी ब्रदर्स सांगत आहेत. यामुळे राज्य सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. बेळगावच्या अंतर्गत काँग्रेस राजकारणात काँग्रेस आणि जेडीएस प्रणित संयुक्त कुमारस्वामी सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आज पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगावच्या सर्किट हाऊस मध्ये पत्रकारांशी बोलताना जर लक्ष्मी गट विजयी झाला तर आम्ही सरकार मध्ये राहायचे की नाही याबद्दल कठोर निर्णय घेऊ आणि तो उद्याच घेऊ असे स्पष्टपणे सांगितले आहे. या निवडणुकीच्या राजकारणात तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस के पाटील ची बदली करण्यात आली आहे. आपण लक्ष्मी यांचे ८० लाख घेतले काय असे पत्रकारांनी विचारले असता मीच तीला मदत केली आम्हाला मदत करण्याएव्हडी ती मोठी झाली नाही. तुम्हाला माध्यमांना खोटी माहिती देण्यात आली असून याचा आम्हाला अकारण त्रास होत आहे, आम्ही केलेली मदत बोलून दाखवत नाही पण आता बोलायची वेळ आली आहे असेही रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.
लक्ष्मी यांच्या बंगळूर येथील गॉड फादर ने त्यांचा हात सोडला तेंव्हा आपण त्यांचा हात धरला म्हणजेच त्यांना मदत केली. त्यांचे वडील कर्करोगाने आजारी असताना आपण त्यांना इंजेक्शन साठी लाखो रुपये दिले. भावाचे शिक्षण आणि मुलाच्यासाठीही अनेकदा त्यांनी मदत मागितली आणि आपण केली आहे. त्यांना काँग्रेस महिला अध्यक्ष बनवण्यासाठी मीच सतीश जारकीहोळी यांच्या मार्फत नाव सुचवले होते, मात्र आता त्या आमदार झाल्यावर भलतेच आरोप करून आमची बदनामी करत असून मला केलेले उपकार बोलावे लागत आहेत असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे.
सध्या या भांडणात सरकार धोक्यात आले आहे. काही सदस्यांना व्यवहार करून लक्ष्मी यांनी आपल्या गटात घेतले आहे, पण हे राजकारण वाईट असून आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे राहू अशी जारकीहोळीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
या आरोपांमुळे काही सदस्य पैसे घेऊन लक्ष्मी यांच्या दावणीला बांधले गेले आहेत हे सुद्धा उघड झाले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही सदस्यांनीही आपली पोळी भाजून घेतल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे निवडणूक होऊन काय होणार यापेक्षा ही निवडणूक राज्याचे सरकार पाडवणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.