अस्वच्छ नदी म्हणून वर्षभर चर्चेला आलेली मार्कंडेय नदी आता स्वच्छ झाली आहे. पावसामुळे वर्षातून एकदाच ही नदी स्वच्छ होते. मात्र नदीतील पाणी पातळी घटली की मार्कंडेयचा प्रवास पुन्हा दुर्गंधीकडे सुरू असतो. याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत या नदीचा कायापालट करण्यात आला खरा. मात्र पहिल्या पावसातच या नदीत पुन्हा गाळ आणि कचरा साचला. त्यामुळे केलेले काम वाया गेल्याचेच दिसून आले. सध्या पावसामुळे नदीला दोनवेळा पुर आला आणि नदीतील सर्व कचरा वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या तरी नदी स्वच्छ झाली आहे.
सरकारी योजनाच्या माध्यमातून नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. याचा विचार करण्यात येत आहे. परिणामी नदीच्या पाणी पातळीत वाढ करून शेतकरी वर्गाला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र काहीनी याकडे दुर्लक्ष करून नदीचे पावित्र्य धोक्यात घातले आहे.
या नदीत बारा महिने पाणी असते. मात्र ८ महिने या नदीत ड्रेनेज पाणी येत असल्याने परिसरातील शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक संघ संस्थानी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी आवाज उठवला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून अनेक सजीव प्राण्याचा जीव धोक्यात घालण्यात आला आहे. पावसाळा सुरू झालाकी नदीतील सर्व कचरा आणि ड्रेनेज युक्त पाणी वाहून जाऊन नदी स्वच्छ होते. त्यामुळे सध्या नदी स्वच्छ झाल्याचे दिसून येते आहे.