कडोली येथे मागील अनेक दिवसांपासून मास्टरप्लॅन करण्यासाठीची धडपड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अनेकांची घरे उद्धवस्थ करून स्वतःची झोळी भरून घेण्याकडे धन्यता काहीजण मानत आहेत. त्यामुळे याला ग्रामस्थातून विरोध झाला होता. आता पुन्हा कोणालाही विश्वासात न घेता रस्त्याची मोजमाप करण्यात आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कडोली येथे सुमारे ६० फूट रुंद रस्ता करण्यात येणार आहे. मात्र मुख्य करून हे मास्टर प्लॅन राबविण्यासाठी ज्यांची घरे जाणार आहेत त्यांना नोटिसा देणे गरजेचे होते . मात्र तसे न करता अचानक रस्त्याचे मोजमाप करण्यात आले आहे. मागिलवेळीही मोजमाप करताना याला जोरदार विरोध करण्यात आला होता याची धास्ती घेऊन पुन्हा गुपचूप मोजमाप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवार दि ५ रोजी दुपारच्या सुमारास मास्टर प्लॅन साठी मोजमाप करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्राम पंचायतनेही याबाबत कोणालाच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे यामध्ये काही नेत्यांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिक हैराण होत आहेत.
केवळ दोन ते तीन की. मी. हा रस्ता होणार आहे. मात्र कडोलीतच का मास्टर प्लॅन ?असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. काहींनी याची धास्ती घेतली आहे. देवगिरी ते बसवाणी मंदिर पर्यंत हा रस्ता होणार असला तरी गावातील नागरिकांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहरा सारख्या ठिकाणी राजकीय दबावातून मास्टरप्लॅन रोखली जातात आणि कडोली सारख्या छोट्या गावात नागरिकांना गरज नसताना असे प्रयत्न होतात याची चीड कडोली ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे.