१५ सप्टेंबर रोजी जिआयटी येथे आयोजित के एल एस संस्थेच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. ते रस्त्याने जीआयटीला जातील अशी शक्यता असल्याने रस्ते दुरुस्तीचे काम एकीकडे सुरू आहे, पण आता ते लवकरच बंद होऊन अर्धवट पडू शकते. कारण राष्ट्रपती कोविंद यांना रस्ते मार्गाने नव्हे तर हेलिकॉप्टरने जीआयटी कॉलेज कडे नेण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या भेटी दरम्यान प्रशासकीय व्यवस्था कशी असेल याचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्त पी ए मेघण्णावर यांनी बैठक घेतली. तेंव्हा अधिकाऱ्यांनी रस्ते खराब असल्याचा मुद्दा सांगून राष्ट्रपतींना रस्ते मार्गाने घेऊन जाण्यापेक्षा त्यांना हवेतून हेलिकॉप्टरने घेऊन जावे असा पर्याय पुढे केला आहे. राष्ट्रपती विमानतळावर आले की त्यांना थेट हेलिकॉप्टरने उद्यमबाग कडे घेऊन गेले तर त्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागणार नाही असे या बैठकीत चर्चा करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये अधिकाऱ्यानीच राष्ट्रपतीनी प्रवास करावा असे रस्ते सध्या नाहीत हे मान्य केले आहे.त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी नेणे हाच योग्य पर्याय त्यांनी पुढे केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे १५ रोजी बेळगावला येऊन के एल एस संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम संस्थेच्या जी आय टी कॉलेजमध्ये ठेवण्यात आला आहे.आता स्थानिक प्रशासन राष्ट्रपती भवनाच्या परवानगीची वाट बघत आहे.परवानगी मिळताच दोन हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. व्हिटीयु च्या जवळ ही हेलिपॅड बनवली जाणार आहेत. हेलिकॉप्टर मधून उतरून व्हीटीयु च्या गेस्ट हाऊस मध्ये तयार झाल्यानंतर राष्ट्रपतींना जीआयटीकडे रस्ते मार्गाने नेण्यात येईल. ५ किमी रस्ते प्रवास फक्त १० मिनिटात पूर्ण करण्याचा हा प्रस्ताव आहे अन्यथा कोविंद यांना एकूण २५ किमी रस्ते मार्गाने जावे लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याला सांबरा विमानतळ ते जीआयटी पर्यंतचे सर्व खड्डे बुजवण्याची सूचना करण्यात आली आहे. कारण राष्ट्रपती जरी हेलिकॉप्टरने गेले तरी राज्यपाल,मुख्यमंत्री,अटर्नि जनरल, सर्वोच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पाहूणे रस्ते मार्गानेच येणार आहेत.
प्रोटोकॉल नुसार व्यासपीठ व मंडप उभारणी होईल याची दक्षताही सार्वजनिक बांधकाम खातेच घेणार आहे.