संतीबस्तवाड येथे मागील काही महिन्यांपूर्वीपासून सरकारी दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे. यामुळे परिसरात नागरिक येथे दारू पिण्यासाठी येत असून मारामारी आणि इतर गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी संतीबस्तवाड येथील महिलांनी सोमवारी जोरदार मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
मागील अनेक वर्षांपासून संतीबस्तवाड येथे कोणत्याही प्रकारची दारूची दुकाने नाहीत. त्यामुळे येथील लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र ग्राम पंचायत ची परवानगी न घेता काहींनी येथे दारूचे दुकान सुरू केले आहे. यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा हे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या गावात सर्व धर्मीय लोक एकमेकाच्या साथीने खेळीमेळीत असतात मात्र हे दारूचे दुकान झाल्यापासून येथे भांडण आणि तंट्याची कामे होत आहेत. गावातील तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. याचा विचार करून या दारू दुकानाला महिलांनी जोरदार विरोध केला आहे.
संतीबस्तवाड परिसरातील अनेक मद्यपी येथे येऊन महिलांची छेड छाड करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हे दारू दुकान बंद करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ते दारू दुकान बंद करा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
सदर निवेदन अबकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.