पिरनवाडी गावच्या प्रवेशद्वारात २००१ मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवून तो चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. पण काही व्यक्तींनी देशभक्त संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न सुरू करून या चौकाला संगोळी रायन्ना यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे संघर्ष वाढत चालला आहे.
गावकऱ्यांचा संगोळी रायन्ना या व्यक्तीला विरोध नाही. ते सुद्धा राष्ट्रभक्तच होते. पण त्यांचा पुतळा बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावर बसवावा आणि जिथे शिवरायांचा पुतळा आहे तिथे कोणताच गोंधळ करू नये अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण असलेला जुना फलक बसवण्याचा प्रयत्न काहींनी केला असता त्या विशिष्ट समाजाच्या युवकांनी विरोध केला यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती शांत केली.
पिरनवाडी प्रवेश द्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकातील फलक काढून दूरुस्तीला देण्यात आला होता. तो परत आणून लावला जात असताना एका विशिष्ट समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांना विरोध केला यामुळे पोलिसांना जाऊन हस्तक्षेप करावा लागला आहे.
शिवराय राष्ट्रपुरुष आहेत. तर संगोळी रायन्ना देशभक्त आहेत. या दोन्ही नेत्यांना वंदन करून ही समस्या सोडवावी आणि संघर्ष टाळावा ही गरज आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून शिवाजी चौक आणि पुतळ्याचे अस्तित्व अबाधित ठेवावे आणि संगोळी रायन्ना यांचा पुतळा उभारण्यास जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.सध्या गावातील दोन्ही समाजाच्या पंच मंडळींची वाद तात्पुरता मिटवला आहे.