राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आक्का लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी आता प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत अशी मागणी मतदार करत आहेत.
रस्ते, गटारी, वीज, पाणी, गावागावात प्रशासकीय सुलभता, बेरोजगारांना रोजगार, महिला व तरुणांना शासकीय मदतीतून उद्योग आणि बरेच काही आक्काच्या आश्वासनांच्या यादीत होते. महिलांना स्वताच्या जीवावर उभे करून त्यांना रोजगार मिळवून देणार असेही त्यांनी सांगितले होते, या योजनांची सुरुवात केव्हापासून होणार असा प्रश्न आता जनतेला पडला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात यावेळच्या पावसाने रस्त्याची चाळण झाली आहे. गावा गावात घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी नाही. प्रशासकीय कामांसाठी बेळगावला आल्याशिवाय पर्याय नाही. शेताची कामे संपली की युवक आणि महिलांच्या बेकारीचा प्रश्न निर्माण होतो. स्वयंरोजगार कडे आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. ही अडलेली कामे पूर्ण करून आक्का आपला शब्द पाळणार का? असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे.
बेळगाव तालुक्याचा मिळून बनलेला हा मतदारसंघ मराठी बहुल लोकांचा आहे. येथील लोकांची पहिली अडचण म्हणजे त्यांना कन्नड वाचता येत नाही. सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळावीत ही त्यांची न्याय्य मागणी आहे. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हे काम करून देईन असे सांगितले होते पण ते काम करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे का नाही? हे सुद्धा कळलेले नाही.
आपल्या काँग्रेस पक्षात आक्कानी मान मिळवला आहे. पक्षाच्या राज्य महिला विंग अध्यक्ष त्या आहेत. काँग्रेस मध्ये दिल्ली पर्यंत त्यांनी वजन तयार केले आहे. पण फक्त पक्षांतर्गत कामे आणि राजकारण यामुळे त्यांना मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या मतदारांनी त्यांच्याकडे बघून विक्रमी मते दिली त्या मतदार वर्गाला त्यांनी नाराज करून चालणार नाही, नाहीतर मग जे या आधी झाले आणि फक्त भाषणे ऐकून लोकांना पोट भरून घ्यावे लागले तसेच काहीतरी पुन्हा होत राहिले तर आक्कावरील विश्वासही उडून जाणार आहे.
आक्कानी आता कामाला लागावे. लोकसभा निवडणुकीच्या प्लॅनिंग पेक्षा जनतेची कामे करावीत. आणि आपण बोलतो ते करून दाखवतो हे दाखवून द्यावे अशी मागणी जनता करत आहे.