अनेकांना सोशल मीडियावर आपले ग्रुप असणे अभिमानाचे वाटत असते. पण त्यावर काहीतरी लिहून गोंधळ घालणे किती महागात पडू शकते याचे उदाहरण समोर आले आहे आणि एक युवकाला मोठा दणका बसला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यामुळे बेळगावातील ‘टॉप मुजिक ओनली ग्रुप’च्या अॅडमिन ला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय राजेंद्र अलगोंडीकर (वय २०, रा. महावीर नगर ,उद्यमबाग) असे अटक करण्यात आलेल्या ग्रुप अॅडमिनचे नाव आहे. अक्षय याने टॉप मुजिक ओनली या नावाने ग्रुप तयार केला होता. युट्यूबवर त्याने या ग्रुपची लिंक शेअर केली होती. त्यामुळे कोणीही या ग्रुपचा सभासद होऊ शकत होता. या लिंकद्वारे ग्रुपमध्ये +९२ नंबर असलेले पाकिस्तानचे दोघेजण सभासद झाले होते. त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडाचेदेखील काही सभासद झाले आहेत. अलीकडेच पाकिस्तानच्या सभासदानी ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून ते ग्रुपमधून बाहेर पडले होते. त्यानंतर अॅडमिन अक्षयने त्यांना पुन्हा ग्रुपमध्ये अॅड केले. तरीदेखील ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ग्रुपवरील आक्षेपार्ह मजकुराचा स्क्रीनशॉट घेउन अक्षयने ते अन्य ग्रुपवर शेअर केले होते. ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सीसीबीचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी स्वतः गुन्हा दाखल करून ग्रुपचा अॅडमिन असलेल्या अक्षय या तरुणाला अटक केली. तो उद्यमबाग येथील एका कारखान्यात कामाला आहे.
ग्रुपचा एडमीन असणे ही गोष्ट किती तोट्यात आणू शकते आणि किती काळजी घेतली पाहिजे हे आता लक्षात घेतले पाहिजे.