घुसखोरी करून वास्तव्य केलेले बांगलादेशी नागरिक आणि सिमीचे स्लीपर सेल यामुळे या अगोदर बेळगाव शहर राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणांच्या रडारवर आहेच ,मात्र खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील चिखले हे गाव या अगोदर जास्त लोकांना माहीत नव्हते मात्र गौरी लंकेश आणि डॉ नरेंद्र दाभोळकर हत्त्या प्रकरणात हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सह देशात प्रकाश झोतात आले आहे.
जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्त्येसाठी संशयित आरोपींनी बेळगाव जिल्ह्यातील चिखले गावातील जंगलात प्रशिक्षण घेतल्याची चौकशी कर्नाटक एसआयटी ने केल्यावर महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येतील प्रमुख आरोपींनी देखील खानापुरात बंदूक चालवण्याचे ट्रेनिंग घेतले की काय असा संशय बळावत चालला आहे.
गौरी लंकेश हत्त्येतील आरोपी विजापूर इंडी येथील परशुराम वाघमोरे याने कर्नाटक एसआयटी ला दिलेल्या माहितीवरून बेळगाव महाद्वार रोड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा कार्यकर्ता भरत कुरणे याला मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती.भरत कुरणे यानें परशुराम वाघमोरे आणी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल काळे यांना खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील चिखले गावाजवळ बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले काय? याचा तपास कर्नाटक पोलिसांनी केलाय.भरत कुरणे याचे चिखले गावात रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्ट मध्ये त्याने जेवणखाण राहण्याची सोय केली होती अशी माहिती तपासात उघड झाली होती, त्यामुळे एस आय टी ने वाघमोरे सह जंगलात येऊन तपास केला होता.
आता त्याच धर्तीवर डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी औरंगाबाद चा सचिन अंदुरे याच्या सह अन्य सगळ्या जणांना बेळगावातील चिखले गावात बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण दिलं गेलं की काय याचा तपास महाराष्ट्र एटीएस करण्याची शक्यता आहे.खानापूर जंगलात बंदूक चालवणे याचे प्रशिक्षण झाले असले तर महाराष्ट्र एटीएस देखील चिखले येथे भेट देऊन तपास करू शकते.बेळगाव पासून जवळपास ३० की मी अंतरावर घनदाट जंगल सुरू होते त्यातच गौरी लंकेश आणि दाभोळकर हत्त्येतील आरोपींचे कनेक्शन तपास यंत्रणाना आढळून आले आहे, त्यामुळं बेळगाव जिल्ह्यातील चिखले हे गावं प्रकाशझोतात आले असून बदनामही झाले आहे.