कुद्रेमनी येथील त्या क्लबवर धाड पडल्यामुळे आता कुणाचेतरी दरमहा १० लाख रुपये दरमहा नुकसान होणार आहे. हा क्लब चालू देण्यासाठी पोलीस खात्यातील एका की अनेक व्यक्तींना मिळून क्लब चालकाला दरमहा १० लाख रुपये द्यावे लागत होते, अशी गुप्त माहिती उघड होत आहे आता धाड पडल्यामुळे ते पैसे घेणाऱ्यांना नुकसान होणार आहे.
कुद्रेमनी हे गाव कर्नाटकात येते. बेळगाव पोलीस कमिशनरेट मधील काकती पोलिसांच्या ताब्यात हे गाव येते. सहा ते सात महिन्यापासून या गावाच्या हद्दीत क्लब चालवला जात असताना त्याला पोलिसांनी आशीर्वाद दिला होता. यासाठीच्या डील मध्ये दरमहा १० लाख देण्याचे ठरले होते. हे १० लाख किती पोलीस अधिकारी मिळून घेत होते याचा तपास करण्याची गरज आहे.
डीसीपी सीमा लाटकर यांनी धाड मारून हे नुकसान केले असल्याने आता ते अधिकारी त्यांच्यावर नक्कीच नाराज झाले असतील यात शंका नाही.
धाड पडल्यानंतर पोलीस दल आणि डीसीपी मॅडमची स्तुती झाली पण सोशल मीडियावर आणखी एक प्रश्नही विचारला गेला. पैसे पोचले नाहीत म्हणून हा क्लब बंद केला का असा हा प्रश्न होता, तेंव्हा बेळगाव live ने शोध घेतला असता क्लब चालक पैसे देत होते आणि पोलिसच आशीर्वाद देऊन हा क्लब चालवायला देत होते अशी माहिती मिळाली आहे.
ही धडक कारवाई करणाऱ्या सीमा लाटकर या पैसे घेण्याच्या यादीत नसल्यानेच ही कारवाई करू शकल्या आहेत. आता त्यांनीच ते पैसे कोण घेत होते याचा तपासही लावावा आणि त्या व्यक्तीवर कारवाई करावी ही गरज आहे.