तुम्ही व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर तास न् तास वेळ घालवत असाल तर सावधान. सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ आणि ‘किकी’ या घातक गेमनंतर ‘मोमो’ या जीवघेण्या गेमनं धुमाकूळ घातला आहे. तुमच्या या नेटवर्कींग साईटवर कोणताही अज्ञात नंबर आल्यास तो सेव्ह करू नका. हाच नंबर कदाचित तुमच्या मृत्यूस कारण ठरू शकतो. थेट आत्महत्येस प्रवृत्त करणारा हा नंबर मोमो (MoMo) म्हणून ओळखला जातो.
‘ब्ल्यू व्हेल’ गेम आणि ‘किकी’ चॅलेंजनंतर सोशल मीडियात ‘मोमो’ चॅलेंज गेम वेगाने व्हायरल होत आहे. हा गेम व्हॉट्सअॅपवरून सर्वाधिक व्हायरल होत आहे. मोमो हा गेम जापानशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतं. जापानचे कलाकार मिदोरी हायाशी यांनी हा गेम तयार केला होता. मात्र सध्या या गेमशी त्यांचा काही संबंध राहिलेला नाही. मोमो चॅलेंज गेममध्ये भयावह चित्रांचा वापर केला जात आहे.
मोमो चॅलेंज स्वीकारणं जीवघेणंच असतं. हे चॅलेंज पूर्ण न केल्यास मोमोकडून यूजर्सला झापले जाते आणि त्याला कठोर शिक्षा देण्याची धमकीही दिली जाते. त्यामुळे यूजर्स घाबरून हे आव्हान स्वीकारतात. मोमोच्या जाळ्यात अडकून यूजर्स मानसिक संतूलन गमावतात आणि मजबुरीनं जीव देतात. विशेष म्हणजे लहान मुलं आणि तरुणांमध्ये हा गेम सर्वाधिक लोकप्रिय आहे.
मोमो गेममधून केवळ चॅलेंजच दिलं जात नाही. तर काही गुन्हेगार या गेमच्या माध्यमातून लहान मुलं आणि तरुणांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात. लहान मुलं आणि तरुणांची खासगी माहिती चोरल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करतात आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात.
असं मिळतं चॅलेंज
>> सर्वात आधी यूजरला अज्ञात नंबर येतो. त्याला सेव्ह केल्यानंतर हाय-हॅलोचा मेसेज येतो
>> त्यानंतर या अज्ञात नंबरवर फोन करण्यासाठी आव्हान दिलं जातं
>> त्यानंतर या नंबरवरून भयावह फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स येऊ लागतात
>> त्यानंतर यूजरला काही टास्क दिलं जातं. हे टास्क पूर्ण न केल्यास त्यांना धमकावलं जातं
डॉ सोनाली सरनोबत
नियती फौंडेशन
बेळगाव