आगामी 10 आगष्ट पासून सुरू होत असलेली एअर इंडियाची बेळगाव बंगळुरु विमान सेवेसाठी चिकोडीचे खासदार प्रकाश हुककेरी यांचे देखील प्रयत्न कामी आले आहेत.स्पाईस जेट ची पाचही विमाने हुबळीला स्थलांतर झाल्यावर जून महिन्यात बेळगाव विमान तळ ओसाड पडलं होतं त्यानंतर चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव विमानतळावरुन विमान सेवेसाठी जोरदार प्रयत्न चालवले होते.
प्रकाश हुक्केरी यांनी 20 जुलै रोजी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि एम डी प्रदीपसिंह खरोला यांची भेट घेऊन बेळगाव बंगळुरू विमानसेवा आठवड्यातील सात दिवस सुरू करा अश्या मागणीचे पत्र लिहिले होते.
बेळगावात संरक्षण खात्याची,केंद्र शासनाची महत्वाची कार्यालये आहेत त्यामुळं बंगळुरू बेळगाव विमान सेवा तात्काळ सुरू करा अशी मागणी त्यांनी केली होती.त्यानुसार एअर इंडियाचे एम डी प्रदीपसिंह खरोला यांनी स्वतः पत्र लिहून 10 आगष्ट पासून आठवड्यातून चार दिवस एअर इंडिया आणि तीन दिवस अलायन्स एअर वेज सेवा असणार असल्याची माहिती दिली आहे.
बेळगावहून बंगळुरू 319 एअर बस उडणार असलं तरी बेळगाव मुंबई ही नेहमी हाऊस फुल्ल असणारी विमानसेवा कधी सुरू होणार यासाठी कोण प्रयत्न करणार हा महत्वाचा प्रश्न आहे.काँग्रेस राज्य सभा खासदार बी के हरी प्रसाद यांनी बेळगावची विमानसेवा का हुबळी स्थलांतर केलात असा प्रश्न विचारल्या नंतर काँग्रेसच्याच हुक्केरी यांनी देखील बेळगाव विमान तळातून विमान सेवेसाठी प्रयत्न केल्याचे समोर आलंय.भाजपचे दोन्ही खासदार आपलं वजन दिल्ली दरबारी टाकून बेळगाव मुंबई आणि बेळगाव चेन्नई,दिल्ली अशी विमानसेवा सुरू करणार का हा देखील प्रश्न विमान प्रवास करणाऱ्यांना सतावत असेल यात काहीच शंका नाही.