बेळगाव भागात मंदिरातील चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे रविवारी खानापूर तालुक्यातील मंदिरात चोरी झालेली घटना ताजी असताना केवळ 24 तासाच्या अंतरात बेळगाव शहरातील मंदिरात चोरी झाली आहे.शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बापट गल्लीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख 8 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांना चोरट्यानी आपले लक्ष केले आहे. यापूर्वी पाटील गल्ली येथील शनिमंदिरात झालेली चोरीची घटना घडली आहे. ही घटना देखील ताजी होती आज पुन्हा बापट गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आले. चोरट्यांनी मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
देवासमोरील दानपेटी फोडून त्यातील सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोकड लांबवून पोबारा केला. आज सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शहर आणि उपनगरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.