आपल्या मतदान कार्यक्षेत्रात विकासाची गंगा आणणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनि आपला विजय केवळ २८०० मताने होईल असे स्वप्नातही पाहिले नसेल मात्र हा त्यांचा विजय नसून पराभवच मानावा लागेल. त्यांच्या नावे भीती घालून बक्कळ पैसे कमविणाऱ्यांनीच त्यांच्या नावाचा गैर वापर केला त्यामुळेच त्याना आज कार्यक्षेत्र फिरण्याची वेळ आणली आहे.जारकीहोळी यांच्या चेल्यानीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे ऐकावयास मिळत आहे.
यमकनमर्डी विधान सभा मतदार संघात आपल्या नावाच्या आणि कामांच्या जोरावर त्यांनी दोन वेळा मतदार संघात एकदाही प्रचार न करता विजयश्री खेचून आणली होती मात्र यावेळीही जरी ते जाहीर प्रचारात उतरले नसले तरी विजय मिळवणे त्यांना कठीण गेले होते.
घरगुती भांडणापासून ते मारामारीपर्यंत आम्ही जारकीहोळी यांची माणसे आहोत, असे सांगून त्यांच्या चेल्यानी त्यांच्या नावाचा दुरुपयोग केला यामुळे समाजात त्यांच्या विषयी आदर नसून आता भीती निर्माण झाली आहे. एकीकडे विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध कामे केली आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या चेल्यानी त्यांच्या नावाची राखरांगोळी केल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकापूर्वी आपण आपल्या मतदान क्षेत्रात प्रचारासाठी फिरणार नाही, असे सांगणारे सतीश जारकीहोळी यांनी मारुती अष्टगी यांना वाढता पाठिंबा पाहून अप्रत्यक्ष रित्या जोराची ताकत लावून रणांगणात उतरावे लागले. जारकीहोळी यांनी निवडून येताच पहिला आपल्या पी.ए. म्हणून फिरणाऱ्याना नारळ देत स्वतः मतदान क्षेत्राचा पाया भक्कम करण्यासाठी भटकंती करू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे ते प्रत्येक गावातील प्राथमिक शाळांना भेटी देऊन समस्या जाणून घेत आहेत खरोखर ते ग्राउंड लेव्हल ला उतरून काम करताना दिसत आहेत.
जारकीहोळी यांच्या चेल्यानी असेच प्रकार सुरू ठेवले आणि संमिश्र सरकार कोसळले तर पुढे त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे ही जाणीव ठेऊनच त्यांनी आता कार्यक्षेत्राचा दौरा सुरू केला आहे. मात्र त्यांचे नाव सांगून दमदाटी करणारे तसेच राहतील की सुधारणार ?की जारकीहोळी यांच्या पाठीत पुन्हा खंजीर म्हणून बोचत राहणार? हा प्रश्न निवडणुकीतच समजणार आहे.