Sunday, November 24, 2024

/

‘समितीनं लोकसभा लढवलीच पाहिजे’

 belgaum

63 वर्षाचा सीमा लढा हे देशातील प्रदीर्घ काळ चाललेलं लोक आंदोलन म्हणून परिचित आहे. सततचे अन्याय अत्याचार सोसत, न्याय मागण्यासाठी मराठी जनता झगडत आहे.प्रश्न न्यायालयात आहे वा केंद्राने सोडवावा अशी टोलवा टोलवी करून 20 लाख मराठी जनतेची ससेहोलपट केली जात आहे.कानडी सासुरवासात भरडल्या जाणाऱ्या मराठी जनतेचं आक्रंदन,राजकीय साठमारीत गुंतलेल्या नेत्यांना दिसत नाही.मराठी युवक अत्याचार सहन करून घेऊनही समितीशी एकनिष्ठ राहिला होता. वयस्क मराठी माणूस समितीच्या बाजूने राहणार हे सत्य आहे., परंतु मुख्य प्रश्न आहे तो युवा वर्गाचा!काहीही घडत नाही,जुने नेतृत्व बदलत नाही,प्रश्नाचं उत्तर सुटत नाही, नेत्यांचा हेकेखोरपणा कमी होत नाही अश्या नैराश्येच्या गर्तेतून तो समितीच्या धाग्यापासून अलग होत चालला आहे.

तरुणाई ही उसळत्या रक्ताची असते, तिला हवा असतो परिणाम.केवळ बौद्धिक खेळीवर त्यांचे चैतन्य शमत नाही,तर त्यांना हवा असतो मनगटाच्या जोशाचा खेळ. मिळत नसेल तर हिसकावून घेऊन अशी धमक त्यांची असते आणि अश्या धमकीची कुमक बाळगायची असेल तर तुमच्या भात्याला पोलादी व्हावं लागेल.सतत लढती द्याव्या लागतील पराभवाची तमा न बाळगता रणांगणावर गर्जना करावी लागेल.

Mes logo

 

दिवाळखोरीत निघालेल्या घराण्याने, वाड्याच्या पडक्या खोल्या सोडत सोडत जावं आणि राहिलेल्या खोल्यात संसार करावा. ही वृत्ती समितीनं सोडली पाहिजे.एकीकरण समितीने किती मतदार संघातून उमेदवारी देणंच बंद केलं आहे याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.या पोरक्या झालेल्या मतदारसंघावर निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष गिधाड झडपा घालत आहेत. तिथला मराठी माणूस आपोआप राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला जाऊन उभा राहत आहे.राष्ट्रीय पक्षांच्या राक्षसी महत्वाकांक्षा मराठी माणसाला कोंडीत पकडून बाटवत आहेत.अश्यावेळी तारतम्यांने विचारकरता एक गोष्ट सहज लक्षात येते की., जया पराजयाची तमा न बाळगता प्रत्येक निवडणूक ही समितीनं लढवलीच पाहिजे.
पराभव होणे ही नामुष्की नसून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याची एक संधीच आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत मतदार संघाच्या रचनेत आम्ही विजयी होण्याची शक्यता कमी आहे.,परंतु आपला मराठी मतदार वाऱ्यावर सोडला जाणार नाही कारण त्याच्या मताला हक्काचा उमेदवार असेल.समिती ही सन्मानाची,निष्ठेची धारा आहे आणि हीच मराठी माणसाची निष्ठा एकत्रीत राखण्याची सुसंधी आहे.आमचे झालेले गट तट मोडीत काढू आणि पराभवाच्या राखेतून एकतेचा ज्वलंत इतिहास निर्माण करू!लोकसभा निवडणूक ही आपल्या मराठी माणसाला एकजीव करण्याची संधी आहे, अन ती संधी दवडणे म्हणजे करंटेपणाच ठरेल.
हरण्यासाठी कोण उभारेल या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे ज्यांनी मराठीची पताका खांद्यावर घेतली आहे तो कोणीही उमेदवार चालेल.लोकवर्गणीतून त्यांच्या उमेदवारीला पाठबळ देता येईल.’त्याग’समितीला नवा नाही ‘मराठीसाठी मराठी माणुस’ या तत्वातून लढा देता येईल आणि संघर्षाचा नवा पाया घालता येईल यात तीळमात्र शंका नाही.

-गुणवंत पाटील

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.