दिशा दर्शक फलकावर लिहिलेले बेळगावी पुसून पुन्हा बेळगाव लिहून महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपण सीमा भागातील मराठी भावनेच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलावर दिशादर्शक फलक बसविण्यात आले होते त्या दिशा दर्शक फलकावर बेळगाव ऐवजी बेळगावी असा उल्लेख करण्यात आला होता. सदर प्रकार माहिती होताच काही तरुणांनी त्यावर आक्षेप घेऊन प्रशासनाला जाब विचारला होता.
बेळगाव सिमाभागातील लाखो मराठी जनता महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी गेली ६० वर्षे लढा देत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सीमाप्रश्न खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे असे असताना हा आतताईपणा कशाकरिता? कॉन्ट्रॅक्टर ने केलेली गंभीर चूक युवकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाला तातडीने जाग आली अन त्वरित कार्यवाही करून बेळगावी चे बेळगाव असे बदलण्यात आले.
रस्ते विकास महामंडळामध्ये कार्यरत असलेले मुंबई कार्यालयातील मधील वरिष्ठ अधिकारी मंगेश शिंदे , सौ. ज्योती कांबळी, औटी , कोल्हापूर विभागाचे बारावकर यांनी स्वतः लक्ष देऊन सदर काँट्रॅक्टर कडून झालेली चूक त्वरित दुरुस्ती करून घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या या बेळगाव प्रेमा बद्दल कोल्हापूर मधील त्या युवकांनी शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.सीमावासीय जनता हा लढा एकाकी पणे लढत असताना सांगली आणि कोल्हापूर या शेजारील जिल्ह्यातील युवकांनी आपण तुमच्या पाठीशी आहोत हेच दाखवून दिले आहे त्यामुळे बेळगावच्या जनतेला एक प्रकारे नैतिक आधारच यामुळे प्राप्त झाला आहे.