खासदार सुरेश अंगडी यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात आपण फार मोठी विकास कामे केल्याचा डांगोरा पेटविला आहे त्याबरोबरच त्यांना पुन्हा एकदा चौथ्यावेळी लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागल्याचे दिसते त्या माध्यमातूनच त्यांनी प्रसार माध्यमाद्वारे आपला प्रचार चालविला आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रीय भाजपने केली असून केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्याचे दिसते इतकेच काय तर देशातील विविध लहान मोठया प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करण्याचे काम जनसम्पर्कच्या माध्यमातून भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार हाती घेतलंय त्यामुळे हातातून सत्ता निसटलेल्या कर्नाटकातून 28 पैकी 20 जागा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगलं आहे.
राष्ट्रीय भाजपचे नेत्यांची प्रामुख्याने उत्तर कर्नाटकातील जागांवर विशेष भिस्त आहे त्यामध्ये बेळगाव लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूकीसाठी भाजपातून अनेकजण इच्छुक आहेत त्यामध्ये विद्यमान खासदार सुरेश अंगडी सह राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील,माजी आमदार संजय पाटील,भाजप मेडिकल सेलचे डॉ रवी पाटील,माजी जिल्हा भाजप अध्यक्ष इरानना कडाडी आणी माजी आमदार विश्वनाथ पाटील आदी जण इच्छुक आहेत यामुळे भाजप मध्ये इच्छुकांसाठी फार मोठी स्पर्धा दिसून येते.या स्पर्धेमुळे खासदार सुरेश अंगडी यांची बेचैनी वाढली आहे.
खासदार अंगडी सतत तीन वेळा बेळगावातून लोकसभेवर निवडून गेलेत त्यामुळे ते एक भाग्यवान गणले जातात पहिल्यांदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या करिष्म्यावर दुसऱ्यांदा माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांच्या नेतृत्वाच्या प्रभावाचा लाभ त्यांना मिळाला तर तिसऱ्यांदा मोदी लाटेत स्वार होऊन निवडून आलेत विशेष म्हणजे अंगडी यांचा एकूणच मागील इतिहास तपासला असता कोणतीच कामाची शिदोरी यांच्या पाठीशी नाही कोणतेच सामाजिक काम किंवा मदत कार्य व जनहिताची कामे करण्याचे संस्कार त्यापासून ते दूरच होते. केवळ हसरा चेहरा व भेटेल त्याला हात जोडून नमस्कार करणे इतकेच काय ते त्यांना जमते त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघा सारखा निर्णायक मराठी मते असलेला मतदार संघ त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरला.
यापूर्वी या मतदार संघातून मराठी भाषिकांच्या मतांच्या आधारे प्रामुख्याने लिंगायत उमेदवारच विजयी झाले आहेत त्यात ए के कोटरेशेट्टी, एस बी सिदनाळ, बाबगौडा पाटील त्यानंतर अंगडीही निवडून आलेत.खासदार अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघाचे तीन वेळा नेतृत्व केलंय पण या काळात खासदार फंडातून त्यांना मिळालेल्या निधीचा वापर कुठे केला त्याचा अहवाल त्यांनी मतदारांना दिला नाही केवळ ऐन वेळेला पत्रकार परिषदा घेणे,अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतल्याचं नाटक करणे,लोकसभा मतदार संघात आधीच मंजूर झालेल्या विशेष कामांचे श्रेय लाटणे व प्रसिद्धी माध्यमांना आपण हे काम केल्याची प्रसिद्धी छाया चित्रासह देणें व स्वतःच्या कार्याची ठिमकी स्वतः वाजवणे या पलीकडे कोणतंच भरीव काम केल्याचे दिसत नाही त्यामुळे त्याना आता येत्या लोकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे.
विशेष म्हणजे बऱ्याच वेळा पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य करून वादग्रस्त विधान करून आपल्याच अंगावर ओढवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.एकूणच खासदार सुरेश अंगडी पक्षांतर्गत फार मोठा विरोध दिसून येतो पक्ष कार्यकर्त्यांशी देखील सलोख्याचे संबंध नाहीत त्यामुळे यावेळची निवडणूकिला त्यांना खडतर मार्गातून जावे लागणार आहे एक मात्र एक गोष्ट खरी आहे दुर्दैवाने खासदार सुरेश अंगडी सारखा दिसायला वागायला नम्र असा उमेदवार असा कोणत्याच पक्षाकडे नाही आहे त्यामुळे असा उमेदवार शोधणे इतर पक्षाना अवाहन ठरणार आहे.
प्रशांत बर्डे(जेष्ठ पत्रकार बेळगाव)