साधारण दुपारी दिड ते दोनची वेळ आणि अचानक मुलींचा आरडाओरडा ऐकू आला. ‘वाचवा वाचवा’ अस काहीसं ऐकायला आलं. मग माझे पाय थरथरत असतानाही मी त्या अडक्याच्या वझराजवळ गेलो आणि पाण्यात उतरलो. समोर तीन मुली बुडताना दिसत होत्या. एक मुलगी थोडी पुढे गेली होती आणि दुसऱ्या दोन थोड्या जवळ होत्या त्यांना हाताने ढकलत काठावर आणल. पण, त्या तिसऱ्या मुलीला वाचवु शकलो नाही . याच दुःख माझ्या मनात कायम आहे.
तिलारी मध्ये धबधब्यात बुडालेल्या युवतीना वाचवणाऱ्या कुद्रेमाणीच्या तेवीस वर्षीय मनोज धामणेकरचे हे उदगार आहेत.
बुडणा-या दोन मुलींना वाचवुन तो आज खरोखर प्रत्यक्षातला ‘हिरो’ झाला आहे.
तिलारी मध्ये अडक्याचा वझर नावाचा धबधबा आहे तो तीस ते पस्तीस फूट खोल आहे. याठिकाणी बेळगाव मधील गोगटे कॉलेजच्या मुली पाण्यात मस्ती करत होत्या. या पाण्यात उतरंड आहे हे कदाचित त्यांना माहित नसाव. आणि अतिउत्साहीपणा नडला आणि त्या पाण्यात पुढे पुढे जाऊ लागल्या. पण नंतर पाय अधांतरी झाल्यानंतर आपण फसलोय हे त्यांच्या लक्षात आलं मात्र , तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इतर असलेल्या सगळ्या मुली या धबधब्याच्या काठावरून त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होत्या मात्र, तो धबधबा सुनसान ठिकाणी असल्यामुळे वाचवणार कुणी येईल ही शक्यताच नव्हती. पण कुद्रेमणीचा मनोज धामणेकर ह्याच परिसरात फिरायला गेला होता. त्याला ही आरडाओरड ऐकायला गेली. स्वतः अपंग असलेल्या मनोजने आपल्या प्राणाचा विचार न करता पाण्यात उडी घेतली दोन मुलींना बाहेर काढलं. पण तिसरी मुलगी (सुप्रीता गाळी वय २०) पाण्यात खूप पुढे गेली होती. ती बुडताना पाहून मनोज खूपच अस्वस्थ झाला. पण तिला मरताना पाहण्या व्यतिरिक्त तो काहीच करू शकत नव्हता.
हा धक्का त्याला इतका बसला आहे की, दोन दिवस तो आजारी आहे. त्याच अंग अजूनही थरथरतय.
पण स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन युवतींचे जीव वाचवणा- या या रियल हिरोच जेवढं कौतुक कराव तितक थोडच आहे. अशा या रियल हिरोला बेळगाव Live चा सलाम…..
#### मनोज हा शिनोळी मधील अॉर्लीकॉन कंपनीमध्ये कामाला जातो. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याने आयटीआय करून घर सांभाळण्यासाठी नोकरी पत्करली आहे.
खरतर या त्याच्या धाडसाची समाजातील सूज्ञ घटकांनी आणि तो जिथ काम करतो त्या कंपनीनं घेऊन त्याचा उचित सत्कार करण्याची गरज आहे.
##*** बेळगावचे पर्यटक स्वतः कुठून परदेशातून आलोय अस दुसऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात.. आपण खूपच वेगळे आहोत अस भासवण्याचा प्रयत्न करतात.. तिलारीकडे असो वा आंबोलीकडे… या बेळगाव वेंगुर्ले मार्गावरून जाताना हूर्रे हुर्रे करत, मद्याच्या बाटल्या बाहेर काढून दंगा करत जातात. अधेमधे टवाळखोरीचे प्रकारही पहायला मिळतात. अस चंदगड मधील नागरिकांचं म्हणणं आहे.. याच बेगडी स्टाईल दाखवण्याच्या नादात अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. त्यामुळे , यानंतर तरी या तरूणाईला काही समज येणार आहे का ? असा सवाल विचारला जातोय. पर्यटनाची मजा लुटण्यासाठी ही दंगामस्ती केल्याशिवाय पर्यटन होत नाही का ? असे अनेक प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत. गेलेला जीव कधीच परत येत नाही. हे या तरूणाईला कोण समजावून सांगणार…..?
न्यूज अपडेट:अनिल तळगूळकर चंदगड