बेळगावात वाढते गुन्हे आणि कारवाई करण्यास पोलिसांची होत असलेली दिरंगाई यामुळे अनेकांना पोलीसांवरील विश्वास कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मटका, जुगार आणि इतर गैरप्रकार वाढत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आपला हप्ता वाढवून घेण्यात रंगत आहेत तर काही स्थानिक पोलीस अधिकारी त्यांची एजंट बनून काम करत आहेत.
बेळगावला भ्रष्टाचार मुक्त अधिकाऱ्यांची गरज आहे.याचा विचार करून बेळगावच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यांचा वाढलेला पारा पाहून अनेक अधिकारी चिडीचूप झाले.
बेळगावात अनेक अवैध धंदे बळावत असून पोलीस मात्र सुस्तावले आहेत. त्यामुळे त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे. असे गैरप्रकार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच साथ मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुम्ही कितीही कमवा मला आणून द्या अशी अट घालून वरिष्ठ अधिकारीच भ्रष्टाचार ला खतपाणी देत आहेत.मात्र याचे कोणीच गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे सीमा लाटकर यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
दरम्यान या बैठकीत काही पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ता देत असल्याचे सांगितले. त्यामुळे डीसीपी मॅडम चांगल्याच तापल्या. त्यांनी त्या अधिकाऱ्याला आपण जनतेचे अधिकारी आहात की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे? असा सवाल केला. ते भडकल्याचे पाहून काही अधिकारी संबंधित अधिकाऱ्यानी फोन करून घडला प्रकार सांगितला. त्यावेळी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही दिवस पंढरपूरच्या वारीला जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली.
काही अधिकाऱ्यांच्या हावरट पणामुळे सध्या बेळगाव अनेक गैरप्रकारात अडकले जात आहे. तेंव्हा यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असा दम सीमा लाटकर यांनी दिला. त्यामुळे काही पोलिसांनी याची धास्ती घेउन १५ जणावर गुन्हे दाखल केल्याचे दिसून आले. ही कारवाई सातत्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढे तरी गैर प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगावला प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे, सरकारने याकडे लक्ष देऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची गरज आहे. नाहीतर खालचे अधिकारी हप्ता देण्यासाठी सामान्य नागरिकांची लूट करून गैर कारभार खुलेआम सुरू ठेवत आहेत.