उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या ही मागणी जोर धरत आहे. उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य आंदोलन समितीने ही मागणी लावून धरली आहे. आता २ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी उत्तर कर्नाटक बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
विविध विध्यार्थी व शेतकरी संघटनांनी मिळून बनलेल्या फोरम ने हा बंद पुकारला आहे. उत्तर कर्नाटकातील एकूण १३ जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन फोरम चे अध्यक्ष सोमशेखर कोतंबरी यांनी केले आहे.
उत्तर कर्नाटकात हैद्राबाद कर्नाटक व मुंबई कर्नाटक हे भाग येतात. बागलकोट, बिदर, बल्लारी,गुलबर्गा,रायचूर, गडग,धारवाड,हावेरी आणि कोप्पळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
२००६ मध्ये उत्तर कर्नाटकाच्या विकासाचे व्हिजन ठेऊन बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध उभारण्यात आले. मात्र विकास झालाच नाही.ही इमारत एक सफेद हत्ती होऊन बसली आहे. आजही आवश्यक कार्यालये स्थापण्यात आली नाहीत तेंव्हा कामासाठी बंगळूरलाच जावे लागत आहे.
मोकलमोरुचे आमदार बी श्रीरामलू यांनी या भागावर अन्याय होत आहे तेंव्हा स्वतंत्र राज्याची मागणीला पाठींबा जाहीर केला आहे. भाजपचे राज्याध्यक्ष बी एस एडीयुराप्पा यांनी ही मागणी फेटाळून लावली असून स्वतंत्र राज्य निर्माण करून काय साध्य होणार नाही असे ते म्हणत आहेत.
मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी वरिष्ठ आणि निवृत्त अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली असून सुवर्ण विधानसौधमध्ये कोणता महत्वाचा अधिकारी व विभाग सुरू करता येईल? याचा विचार सुरू केला आहे.उत्तर कर्नाटकातील नागरिकांना प्रशासकीय कामकाज जवळ मिळवून दिले तर ही मागणी मागे जाईल असे त्यांचे म्हणणे आहे.
उत्तर कर्नाटकासाठी अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे त्याची नियुक्ती करण्याचा विचार आहे.
बेळगाव सह ८६५ खेड्यात विभागलेला सीमाभाग याच उत्तर कर्नाटकात येतो. सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचे आहे. यातच उत्तर कर्नाटकाची मागणी सुरू झाल्याने कर्नाटकातील राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी कन्नड लोक करत आहेत. विकासाकडे दुर्लक्ष हा त्यांचा आरोप आहे, तेंव्हा सीमावासीयांना महाराष्ट्रात जाण्यासाठी हा चांगला पुरावा मिळाला आहे.