शुक्रवारी खग्रास चंद्रग्रहण आहे या निमित्ताने सायंकाळी साडे पाच वाजल्या पासून ग्रहणाचे वेध सुरू होतात त्यामुळे वेध काळात अन ग्रहण सुटे पर्यंत कुणीही अन्न ग्रहण करत नाहीत असे कित्येक जण शास्त्रा नुसार पाळतात मात्र याच्या नेमकं विरोधात समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून आमदार सतिश जारकीहोळी यांनी बेळगावातील सदाशिवनगर स्मशानभूमीत एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय.
चन्द्रग्रहणाच्या निमित्ताने आयोजित अंधश्रद्धा विरोधी कार्यक्रमाच्या निमित्ताने वैकुंठधामात भजी तळण्यात आल्या .भडंग बनवण्यात आला चहा तयार करण्यात आला अन उपस्थितांना वितरीत देखील करण्यात आला. मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जारकीहोळी समर्थकांनी यात सहभाग घेतला.
माजी मंत्री यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी हे दरवर्षी एक रात्र स्मशानभूमीत वास्तव्य करत असतात विविध कार्यक्रम स्मशानभूमीत राबवत असतात. त्यांची ही अंधश्रद्धा विरोधी मोहीम चंद्रग्रहणा रोजी पण सुरूच होती. बेळगावचे महापौर बसाप्पा चिक्कलदींनी,जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे,माजी महापौर विजय मोरे,नगरसेविका सरला हेरेकर यांच्यासह अनेक जण सहभागी होते.
ग्रहणात आहार भक्षण केले तरी काही होत नाही. असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगण्यात आले. स्मशान ही पवित्र जागा आहे आणि याठिकाणी कोणताच संकोच बाळगू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वप्रथम मनातील भीती काढून टाका असेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आले.