श्रीमंती, बंगला, मोटार, गाडी हे सारे येथेच राहणार, मात्र मरण आले की तीन फूट जागा पाहिजेच पाहिजेच. मात्र एका गावात स्वतःची ३५८ एकर जमीन असून देखील त्या गावावर आता अंत्यसंस्कारासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने गावच्या विकासाचे गाजर दाखवून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे.
कंग्राळी खुर्द या गावाला गायरान म्हणून सुमारे ३५८ एकर हुन अधिक जमीन होती. मात्र प्रशासनाने ही जमीन आमिष दाखवून बळकावल्याचाच प्रकार घडला आहे. सध्या या गावात पाटील कुटूबीयांनी ठेवलेली २० गुंठे जमीन स्मशान भूमी म्हणून आहे तर अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांसाठी सुमारे २ गुठे जमीन आहे. मात्र ही जमीन गावातच असल्याने या समाजालाही सरकारच्या धोरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
गावचा विकास करतो म्हणून प्रशासनाने एपीएमसी साठी सुमारे ८३ एकर जमीन काबीज केली आहे, पोलीस हेडक्वार्टर साठी ६५, हनुमाननगर साठी सुमारे ६० एकर, कुमार स्वामी लेआऊट साठी ५० तर सह्याद्री नगर साठी १०० एकर जमीन ही कंग्राळी खुर्द या गावाची गायरान जमीन काबीज करण्यात आली आहे. मात्र ही जागा केवळ गावाचा विकास करतो म्हणून काबीज केल्याचे उताऱ्यात नमूद आहे. गावची जागा घेऊन गावाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गावातुन तिखट प्रतीक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
सध्या असलेल्या स्मशानात जाण्यासाठी ग्रामपंचायत मधून मागील दोन वर्षापूर्वी रस्ता करण्यात आला होता. मात्र आता हा रस्ता खराब झाला आहे. पावसात प्रेत चिखलातच ठेवण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रस्ता करण्याची मागणी होत आहे.
तसे पाहता या गावाची २० हजार लोकसंख्या आहे. मात्र स्मशानाची जागा नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. महत्वाचे म्हणजे सरकारने ही जागा घेताना रोड, गटारी, पाणी, आदी सोईसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता स्मशान साठी जागा नसल्याने कोणी स्मशान देता का स्मशान असे म्हणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.