मराठा लाईट इन्फंट्रीला गौरवशाली शौर्याचा इतिहास आहे.शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तीला सैनिकांच्या जीवनात खूप महत्व आहे.प्रशिक्षण काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तुम्हाला सेवा बजावताना उपयोग होणार आहे,असे उदगार मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी काढले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४१२ जवानांचा शपथविधी आणि दीक्षांत समारंभ मराठा सेंटरमध्ये पार पडला.याप्रसंगी ब्रिगेडियर गोविंद कलवड बोलत होते.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानाकडून ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी मानवंदना स्वीकारून संचलनाचे निरीक्षण केले.तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी मातृभूमीच्या रक्षणाची शपथ घेतली.परेडचे नेतृत्व कॅप्टन रॉबिन अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली जवान योगेश बाळासो आवळेकर यांनी केले .
विनायक दिगंबर जाधव ,विक्रम लव्हाटे,सागर कांतीलाल माने या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांना प्रशिक्षण कालावधीत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पुरस्कार देण्यात आले .दीक्षांत समारंभाला अधिकारी ,जवान ,प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे कुटुंबीय आणि निमंत्रित उपस्थित होते .