काँग्रेस रोडची वाताहत झाली असून गुरुवारी उपमहापौर मधुश्री पुजारी व काही नगरसेवकांनी पाहणी केली. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे येथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे, अशा सूचना उपमहापौर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
बेळगावातील महत्वाचा रस्ता म्हणून काँग्रेस रोडकडे पाहिले जाते. मात्र या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावरील खडी बाहेर पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. रस्ता खराब झाल्याने छोटे मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली होती.
या मागणीची दखल घेऊन महानगर पालिकेचे महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधुश्री पुजारी व इतर नगरसेवकांनी गुरुवारी तिसरे रेल्वे गेट ते पहिले रेल्वे गेट पर्यंत पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना कोणत्याही योजनेतून तात्पुरती डागडुजी करावी, अशा सूचना यावेळी अभियंत्यांना करण्यात आल्या.
हा रस्ता सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत होणार असून अजून त्याला उशीर होणार आहे. मात्र सध्या वाहन चालकांना या रस्त्यातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तात्पुरते खड्डे बुजविण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या. पंचामृत ते पहिल्या रेल्वे गेट पर्यन्त यावेळी रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक पंढरी परब,गट नेते संजय शिंदे, अनंत देशपांडे,मोहन भांदुर्गे आदी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
साई मंदिर ते अरुण थिएटर पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी खड्ड्यांची खुदाई करण्याची गरज आहे. त्यानंतर पुन्हा काँक्रेटकरणं करावे अशी मागणी नगरसेवक पंढरी परब यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे पहाणी दौऱ्यात महापौर बसप्पा चिखलदिनी यांच्या अंगावर देखील चिखल उडाला त्यामुळं या रस्त्याच्या दयनियतेची जाणीव महापौरांना झालीय असेही परब म्हणाले.