सांबरा विमानतळ हायटेक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असताना येथील शेतकऱ्यांना मात्र अजूनही उपेक्षित ठेवण्यात आले आहे. विमानतळ परिसरात रस्त्यांची झालेली वाताहात पाहता येथील शेतकरी वर्गाला शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला तरी रस्ता मात्र करण्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले आहे.
140 कोटी खर्च करून विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. मात्र यासाठी जमीन उपलब्ध करून दिलेल्या शेतकऱ्यांना मात्र चांगला रस्ताही नाही. त्यामुळे शेताकडे जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
एकीकडे बोईंग विमान उतरविण्यासाठी गुळगुळीत रस्ते तर दुसरीकडे चिखल आणि खड्ड्यातून शेतकऱ्यांची वाताहत होताना दिसत आहे. विमान विस्तारीकरण करण्यासाठी सुमारे 370 एकर जमीन काबीज करण्यात आली आहे आणि मोबदल्यात दुरावस्था झालेले रस्ते देण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकरी वरगातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्यांसाठी मागील दोन वर्षे पूर्वी 72 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी कंत्राटदाराला डोस देऊन शेतकऱ्यांना हा रस्ता तातडीने करू द्यावा असे सांगितले होते. कंत्राटदार नागराज नायडू यांनी त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला होता. त्यावेळी हा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. लवकरात लवकर हा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
सांबारा भागातील शेतकऱ्यांना 500 एकर हुन अधिक सुपीक जमीनीत कसण्यासाठी रास्ता पार करून जावे लागते मात्र या रस्त्याची दुर्दशा पहाता शेती करणेच नकोसे झाले आहे.ग्रामीण मतदार संघातील रस्ते चकाचक करण्यासाठी शासनाने 5 कोटी निधी दिलाय मात्र हा विमानतळा च्या बाजूचा रस्ता कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.