देशात सर्वात जास्त पाऊस हा आसाम मधील चेरापुंजी(मावश्यराम)येथे पडतो त्यामुळं साहजिक जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणाला चेरापुंजी असे संबोधतात.कर्नाटकात सर्वाधिक पाऊस शिमोगा जिल्ह्यातील आगुमंबे तर बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकुंबीत पडतो आणि बेळगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस राकसकोप येथे पडतो त्यामुळं आपसूकच राकसकोप हे बेळगावचे चेरापुंजी आहे.
राकसकोप तुडये -हाजगोळी परिसरात 4 दिवसात 366 मी मी पावसाचा तडाखा पडला आहे. या तुडये हाजगोळी परिसरात मागील चार दिवसात पावसाने जोरदार तडाखाच दिला आहे.
(हा फोटो तुडये येथील भात शेतीचा आहे )
शनिवार ता 14 जुलै ते मंगळवार ता 17 जुलै या चार दिवसात अक्षरशः पावसाने कहर करत परिसराला झोडपून काढले . या चार दिवसात एकूण 366 मी मी पावसाची विक्रमी नोंद झाली . 14 जुलै – 66 मी मी , 15 जुलै – 95 मी मी , 16 – जुलै 106 मी मी तर 17 जुलै रोजी 99 मी मी पाऊस पडला . अशाप्रकारे चार दिवसात जवळ जवळ 400 मी मी पाऊस पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे . आतापर्यंत या परिसरात विक्रमी 2200 मी मी पावसाची नोंद झाली आहे . जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत एवढा पाऊस कोणत्याही वर्षी पडला नव्हता . दीड महिना झालेल्या या प्रचंड पावसामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे .
राकसकोप सह तुडये ,हाजगोळी , कोलीक ,म्हाळूंगे , मळवी , सरोळी , सुरूते ,ढेकोळी या गावातील भातशेती पाण्याने तुडुंब भरली आहे. नदी – नालेही भरून वाहत आहेत . सर्वच गावातील माळशेतीत पाणी भरले आहे. पीके धोक्यात आली आहेत . काजू रोपांचे नुकसान होत आहे . रताळी , भुईमूग ,नाचणा या पिकांवरही मोठा परिणाम होत आहे . परिसरातील राकसकोप धरण तुडुंब झाले असून त्याचे दरवाजे वर करण्याची वेळ आली आहे . 4 टी एम सी क्षमता असलेले तिलारी धरण सुद्धा काटावर येऊन पोहचले आहे . या पावसाने आज बुधवारी थोडा मारा कमी केलाय असे वाटत आहे . तरीही थोड्या थोड्या विश्रांतीनंतर तेवढ्याच जोराने कोसळतो आहे ! एकूण या वर्षीच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे !
न्यूज अपडेट-हर्षवर्धन कोळसेकर तुडिये