मोठा गाजावाजा करून आणि तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून बेळगावच्या किल्ला परिसरात उभा केलेला सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा उपक्रम मागे पडला आहे. वारंवार पाऊस आणि वाऱ्याने ध्वजाचे कापड फाटू लागल्याने फक्त रिकामा पोल उभा आहे. आणि त्यावर फडकवण्याच्या ध्वजाचे काय झाले? याचा शोध बेळगाव live ने घेण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बातमी मिळाली आहे. हे ध्वज सन्मानाने ठेवण्यात आलेले नाहीत, तर त्यांचा अवमान करण्यात येत आहे.
राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार ध्वज अतिशय सन्मानाने ठेवणे गरजेचे आहे, पण तसे न करता ते चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आले असून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान सुरू आहे.
याच किल्ला परिसरात एक ध्वज जमिनीवर टाकून देण्यात आला आहे. दुसरा ध्वज एका सिंटेक्स टाकीवर ठेवण्यात आला आहे. तिसरा ध्वज एका गटारीवर पडून आहे तर त्याच शेजारी एका कपड्यात गुंडाळून चवथा ध्वज ठेवण्यात आला आहे.
या ध्वजांची व्यवस्थित घडी घालून ते एका बंदीस्थ खोलीत किंवा कपाटात ठेवले पाहिजे होते, पण तसे न करता ते चुकीच्या प्रकारे ठेवले गेले आहेत. या गोष्टीकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.
याप्रकारे ध्वजाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे पण याकडे लक्षच देण्यात आले नाही. असेच होत राहिल्यास भारतीय तिरंगा ध्वजा च्या अवमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची गरज आहे. देशप्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी याकडे लक्ष देऊन हा अवमान थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.पाहणी दौऱ्यात व्यस्त असलेले नवनियुक्त लोक प्रतिनिधी यांकडे जरा लक्ष देतील का?