दोन जवान शहीद झाले आणि त्यांच्या मैत्रीचीही चर्चा झाली. एक कारवारचा तर दुसरा खानापूर तालुक्यातील हलगा गावचा. सैन्यात भरती झाल्यापासून एक मेकांची साथ कधीच न सोडलेल्या या मित्रांनी आपली दोस्ती म्र्युत्यु पर्यंत निभावली, शोले चित्रपटात असलेले गीत *ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे* ची या निमित्ताने आठवण होते.
विजयानंद सुरेश नायक (रा.कारवार ) आणि संतोष गुरव (रा.हलगा खानापूर) यांचा मृत्यू झाल्याने त्या दोघांच्याही कुटुंबावर दुःख कोसळले आहे. संतोष आणि विजयानंद हे लष्करात एकमेकांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जात होते. नोकरीत भरती झाले तेंव्हापासून ते एकमेकाला सोडून राहात नव्हते. एकाच कंपनीत त्यांना नेमण्यात आले आणि खानापूर व कारवार या एकाच संस्कृतीतले हे मित्र एकमेकांचे जिवलग झाले होते.
कोणतीही लष्करी कामगिरी असली तरी ते एकत्रित कामावर जात होते. सोमवारी ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळीही ते एकत्रच गस्त घालत होते. नक्षलींचा अचानक हल्ला झाला आणि दोघेसुद्धा गंभीर जखमी झाले होते. एकमेकांच्या शेजारीच त्यांनी आपला जीव सोडला आहे.
लष्कराची नोकरी फार जिकिरीची असते. कधी कुठे शत्रू हल्ला करेल याचा नेम राहात नाही. सैन्यात गेलेला माणूस लष्करी वातावरणात असला तरी स्वतःपासून फार दूर आणि एकटा एकटा असतो. घर दार, आई बाबा, बायको मुले यांना सोडून त्याला मानसिक कोंडमारा सहन करत जगायचे असते. अशावेळी जीवाला जीव देणारा कोणी जर भेटला तर त्याला आधार मिळतो.
याच कारणामुळे शहीद जवान संतोष आणि विजयानंद ची मैत्री जमली होती. चांगली मैत्री किंव्हा प्रेमात शपथ घेतली जाते की मरे पर्यंत साथ देण्याची.
ही शपथ या दोन्ही मित्रांनी पूर्ण केली. देशसेवा करतांना मैत्री देखील निभावली. आज ते शहिद झाले पण त्यांची देशभक्ती आणि मैत्रीची आठवण कायम अमर राहणार आहे.
एकवेळ श्वास सोडेन पण मैत्री सोडणार नाही असे म्हणून प्राण सोडलेल्या त्या वीर जवानांना बेळगाव live चा सलाम.