नक्षल वाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हलगा येथील जवानास वीरगती प्राप्त झाली आहे. बस्तर (छत्तीसगड) कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आईडी स्फोटात बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाल्याची घटना (सोमवारी) सायंकाळी घडली. यातील एक जवान संतोष लक्ष्मण गुरव (वय 28) हे खानापूर तालुक्यातील हलगा आहेत. त्यांचे पार्थिव उद्या (बुधवारी) त्यांच्या हलगा या गावी आणले जाणार आहे.
शहीद जवान संतोष गुरव आणि विजयानंद नायक तालमेडा कँपमधून सहा किमी.अंतरावर गस्त घालण्यासाठी जात असतांना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला.
नक्षलवाद्यांनी आधी आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. गोळीबाराला उत्तर देतांना बीएसएफच्या जवानांनी जोरदार प्रतिहल्ला केल्यानें नक्षलवादी पळून गेले. जखमी संतोष आणि नित्यानंद यांना कँपकडे आणले जात असतांना त्यांना वाटेतच वीरमरण आले. संतोष गुरव हे चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात रुजू झाले होते. तीन महिन्यांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन बहिणी असा परीवार आहे.
संतोष गुरव आणि नित्यानंद नायक हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. कोणत्याही कामगिरीवर जातांना ते दोघे एकत्र असायचे. काल (सोमवारी) देखील ते एकत्रच गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर नक्षली हल्ला झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असता उपचाराला नेतांना त्यांना वीरमरण आले. ते शेवटपर्यंत एकत्रच राहिल्याची आठवण त्यांच्या मित्रांकडून समजली.