सन्मान हॉटेल जवळ झालेला अपघात आणि त्यानंतर झालेला गोंधळ आणि चालकाची धुलाई या गोष्टींची बेळगाव आणि भागात चर्चा झाली. या अपघातात एक कोवळा बालक दगावला याचे दुःख सम्पूर्ण बेळगाव शहराला झाले आहे.
अपघात घडला तो टाळता आला असता की नाही? याची चर्चा होईल पण तो झाल्यावर जो काही आततायी पण झाला याची चर्चा बेळगाव शहरात फार जोराने सुरू आहे.
कोणताही अपघात बघा, चूक कुणाचीही असो ज्याची गाडी मोठी त्याने मार खायचा हे ठरलेले आहे. ज्याची जीवित हानी झाली तो खरा आणि ज्याचे वाहन मोठे तो मार खाणार हे ठरलेले आहे, आजही तसेच झाले, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
अपघात झाल्यावर वाचवणे सोडून लोक मारण्यावर भर देतात हे चुकीचे आहे, अपघात घडतो तो घडवला जात नाही हे लक्ष्यात घ्यावे लागेल नाहीतर मार खाण्याच्या भीतीने वाचवण्यापेक्षा पळ काढणे योग्य ही मानसिकता वाढीस लागेल, यात शंका नाही.रविवारी किल्ला तलावा जवळ दुचाकी टेम्पोत किरकोळ अपघाताचे हाणामारीत पर्यवसन झाले होते आजही अपघाता नंतर गोंधळ आणि चालकास हाणामारी झालीच.एकूणच अपघात कसे कमी होतील याकडे समाजाने पहाणे गरजेचे बनले आहे. सामाजिक संघटनांकडून देखील विचार मंथन होणे गरजेचे आहे आपल्या मुलांना पालकांनी आणि शिक्षकांनी योग्य समुपदेशन करायला हवं.
या अपघातात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती रहदारीच्या कोंडीची आणि मदत करण्यापेक्षा मोबाईल वर फोटो आणि शूटिंग करणाऱ्या लोकांची…..
अहो मदत करा की, नाही, यांचे काम फोटो काढण्याचे, पूर्वी एक तक्रार व्हावयाची की प्रेसवाले अपघात झाला की खूष होतात चांगली बातमी मिळाली म्हणून, पण आज काय चालले आहे?
प्रत्येकजण खुश होतोय कारण सगळेच सोशल मीडियावर पहिला मी दुर्घटनेच्या फोटोचा हकदार होण्यासाठी धडपडत आहे, हे दुर्दैव….
आजच्या घटनेतही हेच जाणवले, तिथे त्या कोवळ्या मुलाचा मृतदेह पडलेला आणि हे आमचे सोशल मीडिया रिपोर्टर घेत होते फोटो
कधी सुधारणार ही जनता ?