बीजगर्णी गावातील महिला, पुरुष आणि सर्वच नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गावच्या हक्काचे गोमाळ वाचवा आणि या गोमाळावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गावातीलच काही व्यक्ती या गोमाळावर अतिक्रमण करून त्याचा स्वतःच्या खासगी कारणासाठी उपयोग करू लागले आहेत. तसेच हे गोमाळ इतर नागरिकांना वापरण्यासाठी मज्जाव करू लागले आहेत, असे निवेदनात लिहून जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.
गावातील सर्व नागरिकांची जनावरे चरण्यासाठी गोमाळ ही सार्वजनिक जागा निश्चित करण्यात येते. बीजगर्णी गावातही ही जागा पूर्णपणे सार्वजनिक वापरासाठीच निश्चित करण्यात आली आहे. पण संबंधित व्यक्तींनी त्या जागेवरही अतिक्रमण सुरू केले असल्याने आता त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे असेही निवेदनात लिहिले आहे.
गोमाळ ही परंपरा ब्रिटिश कालखंडापासून चालत आली आहे. या जागेवर संपूर्ण गावकऱ्यांचा हक्क असतो, या जागेवर कुणा एकाला आपला हक्क सांगता येत नाही पण जे लोक असे करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांची दादागिरी गावकऱ्यांवरच वाढली आहे. असे लिहून त्या व्यक्तीची नावेही जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत.