स्वच्छ बेळगाव सुंदर बेळगाव ही घोषणा फक्त कागदावर आहे. नागरिकांकडून कर वसूल करून मनपाचे स्वच्छता अधिकारी योग्य काम करत नाहीत, आणि त्यांच्या या पापात नगरसेवक वाटेकरी असतात हे नवीन नाही. या परिस्थितीत घाण झालेल्या बेळगाव च्या स्थितीवर ज्येष्ठ आयएएस अधिकारी व सामान्य प्रशासन खात्याचे अधिकारी भडकले.
ते बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी हार तुरे घेऊन गेलेल्या अधिकारी वर्गास त्यांनी परत पाठवले असून तुम्ही तुमचे काम नीट करा असा सल्लाही दिला आहे. येथील अस्वच्छतेबद्दल ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
पसरलेला कचरा, साचलेले कचरा कुंड, सांडपाणी हे सगळे बघायला चांगले दिसते काय? असा प्रश्न त्यांनी केला.बऱ्याच ठिकाणी स्थानिक अधिकारी स्वच्छता ठेवण्यात कमी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा अधिकाऱ्यांकडून स्वागत स्वीकारणे अपमान आहे असे म्हणून त्यांनी परत पाठवले व चांगलीच खरडपट्टी काढली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इतका पाण उतारा केला तरी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वच्छता राखण्यासाठी काही करतील अशी अपेक्षा नाही, पैसे खाऊन सोकावल्याने स्वतःच बरबटलेल्यांना घाण दिसणार कशी? यामुळे मोहनबाबू तुमचा राग आवरा आणि पुढच्यावेळी बेळगावला यायचे असेल तर चांगला परफ्युम नाकाजवळ मारून या, हाच स्मार्ट सिटीत येताना स्मार्ट उपाय असेल.