छोटा भाऊ आजारी आहे. त्याची प्रकृती बरी नसल्याने मोठा भाऊ त्याला बघण्यासाठी बेळगावला येत होता. मिरज येथून निघालेला हा भाऊ बेळगाव पर्यंत आलाही होता, आपल्या भावाला बघण्याची ओढ त्याला होती, पण झाले भलतेच बेळगाव पासून फक्त दहा ते बारा किलोमीटर वर अपघात झाला आणि तो ठार झाला.
ओमनीची थांबलेल्या कॅन्टरला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमागील परिस्थिती पाहता कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल, आपल्या भावाच्या ओढीने येत असलेल्या भावावरच काळाने घाला घातल्याचा हा प्रकार आहे.
थांबलेल्या टँकरला ओमनी कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातात ओमनी मधील एक जण जागीच ठार तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथे घडली आहे.
जावेद हुसेन मुश्रीफ वय ६५ (रा.मिरज महाराष्ट्र )असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे तर सबाबी मुश्रीफ वय ५०,आरिफ अल्ताफ मुश्रीफ वय १७,सफिजा मुश्रीफ वय १५( सर्व रा.मिरज )हे जखमी झाले आहेत. जखमींना बेळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ परिवार बुधवारी सकाळी ओमनी कार मधून मिरजहुन बेळगावला येत होते त्यावेळी ओमनी ने पाठीमागून थांबलेल्या कॅन्टरला जोराची धडक दिली.चालकाकडून सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करतेवेळी हा अपघात घडल्याची देखील माहिती मिळाली आहे.मयत जावेद मुश्रीफ यांचा भाऊ बेळगावला असतो त्याची तब्येत बरी नसल्याने विचारपूस करण्यासाठी बेळगावला येतेवेळी हा अपघात घडला आहे.काकती पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
यापूर्वी देवदर्शन करून येताना, लग्नाला किंवा मयत व्यक्तीच्या दर्शनाला जाताना असे प्रकार घडले आहेत. चालकाची एक छोटीशी चूक त्यांना महागात पडली आहे. या अपघाताने एक भावाची दुसऱ्या भावाशी होऊ घातलेली भेट हिरावून घेतली असून प्रचंड दुःख व्यक्त होत आहे.