पोलीस आयुक्तांनी प्रत्येक मंगळवारी सुरू केलेल्या जनस्पंदन कार्यक्रमाला त्रोटक प्रतिसाद मिळत आहे. फक्त पोलीस आयुक्तालयातील तक्रारींना स्थान असल्याने या कार्यक्रमाला जास्त तक्रारदार येऊ शकत नाहीत. यामुळे पूर्वीसारखे भव्य स्वरूप येत नाही.
पूर्वी बेळगाव जिल्हा पोलिस असा प्रकार होता. पूर्ण जिल्हा पोलिस प्रमुखांच्या ताब्यात होता. त्यावेळी पूर्ण जिल्ह्यातील तक्रारदार अशा कार्यक्रमांना दाखल होत होते. पोलीस आयुक्तालय झाल्या पासून बेळगाव शहर आणि काही भाग जिल्ह्यातून वगळून तो आयुक्तांच्या हाताखाली देण्यात आला.
पूर्वीच्या पोलीस प्रमुखांनी राबवलेल्या कार्यक्रमांना चांगली साथ मिळाली होती. जिल्हापोलिस प्रमुख पदी हेमंत निंबाळकर असताना त्यांनी आक्का ताई संमेलन या नावाने या कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये महिलांना स्थान दिले जात होते. अन्याय सोसून महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. घरगुती स्वरूपात शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला त्यांना सामोरे जावे लागते, तेंव्हा त्यांना हे व्यासपीठ खुले करून देण्यात आले होते, प्रतिसादही चांगला मिळत होता, पण जसे हेमंत निंबाळकर बदली होऊन गेले तशी ही पद्धत बंद पडली.
त्यानंतर संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच जनता दर्शन कार्यक्रमाचा पाय संदीप पाटील या पोलीस प्रमुखांनी रचला. प्रत्येक गुरुवारी हा कार्यक्रम होत होता. तक्रारदाराची गर्दी होत होती. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी नाकारलेल्या तक्रारी थेट पोलीस प्रमुखकडे देऊन त्यावर न्याय मिळवुन घेण्याची संधी लोकांना मिळाली होती.
संदीप पाटील यांची बदली झाली आणि ही पद्धत सुद्धा बंद पडली होती. आता सरकारी आदेश आल्यावर पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी जनस्पंदन या नावाने हा कार्यक्रम परत सुरू केला आहे. दोन मंगळवारी सरासरी पाच ते सात तक्रारी असे स्वरूप असून नागरिकांना न्याय मिळतोय की नाही हे अजून खात्याने कळवले नाही.