आज महिला वर्गाचा खास सण वटपौर्णिमा आहे. वडाच्या झाडाला फेऱ्या घालून हाच पती सात जन्म मिळू दे अशी प्रार्थना महिलावर्गाकडून केली जाणार आहे. यासाठी आवश्यक तयारी झाली असून आज दिवसभर या सणाच्या वातावरणात महिला गुंतून राहणार आहेत(फोटो बुधवारी सकाळ सकाळीच संयुक्त महाराष्ट्र चौकातील वडाच्या झाडाला पूजा करण्यात महिलांची गर्दी होत होती)
सत्यवान आणि सावित्री ची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. सावित्रीने तप करून यमाकडून आपल्या पतीचा जीव परत आणला आणि तेंव्हापासून या सणाचा पाया रचला गेला. आजच्या आधुनिक काळातही महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. पती आणि पत्नीच्या नात्यामधील प्रेम आणि आपुलकीच्या नात्याला भक्कम करणारा हा सण यामुळेच सर्वत्र साजरा केला जातो.
बेळगाव आणि परिसरात अनेक वटवृक्ष आहेत, काही महिला वडाला प्रदक्षिणा घालून, काही वडाच्या किंवा इतर वृक्षांच्या फांद्या घरी आणून तर काही इतर वृक्षांनाच वड मानून हा सण साजरा करतात. नटून थटून, पूर्णपणे पारंपरिक वेशामध्ये महिलावर्ग हा सण साजरा करताना दिसून येतो. एकमेकींची ओटी भरणे आणि शुभेच्छा देणे चालत राहते. या सणात वडाच्या वृक्षाला दोर बांधण्याची एक प्रथा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही प्रथा घातक असल्याचे बोलले जाते, यामुळे जास्त गुरफटवून वडाला त्रासात घालू नका अशी ओरडही होते पण धार्मिक भावना जपताना हे सारे वर्षानुवर्षे चालू आहे.
या दिवशी महिला उपवासही करतात. तमाम पुरुष वर्गाने आपल्या आयुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या सावित्री चा आदर राखण्याची शिकवणही या सणातून घेतली तर पती पत्नीचे नाते अधिक भक्कम होईल.