वारंवार मराठी कागदपत्रे देण्याच्या मागणीवरून तालुका पंचायत मध्ये म. ए. समितीचे सदस्य आक्रमक होतात. त्यामुळे मागील बैठकीत मराठीतून कागद पत्रे मिळावीत यासाठी मराठी सदस्यांनी आक्रमक होऊन मराठी कागदपत्रे मिळावीत याबाबत चा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र हा ठरावच इतिवृतांमधून गायब करण्यात आला आहे. त्यामुळे सदस्यांतुन संताप व्यक्त होत आहे.
मराठी कागदपत्रे मिळावीत अशी मागणी मागील चार ते पाच बैठकीमधून करण्यात येत आहे. मात्र अध्यक्ष आणि अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे मागील बैठकीत मराठी कागदपत्रे मिळावीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र मराठीची पोटदुखी असलेल्या कानडी अधिकारी आणि सदस्यांनी याकडे दुर्लक्ष करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या कृत्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
दि. १५ जून रोजी तालुका पंचायतीची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत याबाबत मराठी सदस्य कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. महत्वाचे म्हणजे अध्यक्ष यांनी समांतर फंड वितरणाबाबत गप्प राहण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे त्यांच्याच गटातील काही सदस्य नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दि. १५ रोजी तालुका पंचायतीमधील सभागृहात होणारी सभा वादळी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.



