सोने तारण म्हणून बँक अथवा सोसायट्यामध्ये सोने ठेवतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोने बदलून बनावट सोने मिळण्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे ग्राहक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ग्राहक आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सोने तारण ठेवतात. मात्र बनावट सोने हाती येत असल्याने महिलांची घालमेल वाढू लागली आहे. काही बँक व सोसायट्यामधून असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यानी काही वर्षापासुन कमी व्याजदरात सोने तारणवर कर्ज देण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी मोठी जाहिरातबाजीही करण्यात आली आहे. मात्र या गोष्टींकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्याकडून घेतलेले सोने चोख मिळणार काय? अशी भीती बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हापूर येथील एका बँकेत असा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. तर बेळगाव मध्येही काही ठिकाणी अश्या घटना घडल्या आहेत.
अनेक बँक आणि पतसंस्था मध्ये हजारो गरजूंनी सोने तारण ठेवले आहे. काहींनी तर पैशांची जमवाजमव करून ते कर्ज फेडले. मात्र त्यांना खरे सोने मिळालेच नाहीं. त्यामुळे यापुढे सोने तारण ठेवताना काळजी घेण्याची गरज आहे.
गेल्या चार ते पाच वर्षात असे प्रकार वाढले आहेत. काही ग्राहक तर बँक अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून लाखो रुपये बनावट सोन्यावर उचलण्याचा प्रकारही घडले आहेत. मुदत संपूनही तीन ते चार वर्षे झाली तरी बनावट सोने ग्राहक सोडवून नेत नाहीत. त्यानंतर ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती झाल्यावर बनावट सोन्याचा प्रकार उघडकीस येतो. घर बांधणे, लग्न, अथवा शिक्षण नाहितर आजारीपणासाठी ग्रामीण भागातील महिला अथवा पुरुष सोने तारण ठेवतात. मात्र बँकांनीच फसविल्यास कोणाकडे विश्वासाने सोने तारण ठेवावे? असा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.
सोने तारण असे करतात
सराफाकडून सोन्याची खात्री पटल्यानंतर ते सोने सीलबंद करून एका लॉकरमध्ये ठेवण्यात येते. तारण कर्जाच्या अर्जावर ७ ते ८ सह्या करून घेतात. त्यानंतर पैसे दिले जातात. त्यानंतर सीलबंद लॉकरमधील सोने कोण बदलतो? याला संबंधित अधिकारी व कर्मचारीच जबाबदार राहतात.