मुस्लीम बांधवांच्या रमजान पर्वाला प्रारंभ झाला असून सर्वांत पवित्र मानला जाणाऱया रमजान महिन्याचे आचरण केले जात आहे. नमाज पठण करणे, रोजा (उपवास) पाळणे, कुराण वाचणे, दुवा मागणे अशा प्रकारे रमजान साजरा केला जात आहे. रमजानच्या निमित्ताने शहरातील मुख्य समजली जाणारी म्हणजे खडे बाजार ची बाजारपेठ! ही बाजार पेठ बहरली असून मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमजानची आतुरतेने वाट पाहणाऱया मुस्लीम बांधवांतर्फे रमजान पर्व मोठय़ा उत्साहात साजरे केले जात आहे. इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा नववा महिना असून 7 मे पासून रमजान पर्वाला प्रारंभ झाला आहे. शुक्रवार 17 मे पर्यंत 11 रोजे पूर्ण झाले आहेत.
रमजानच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांबरोबरच बाजारपेठा सज्ज झाल्याचे दिसून येत असून विविध खाद्यपदार्थांच्या रेलचेलबरोबरच खरेदीसाठी विविध साहित्य दाखल झाले आहे. मुस्लीम बांधव खजूर खाऊन रोजा सोडतात. यामुळे खजुराबरोबरच शाकाहारी, मांसाहरी असे गरमागरम खाद्यपदार्थ विक्रीसाठी दाखल होत असून रोजा सोडण्यासाठी रोज विविध खाद्यपदार्थांची चव चाखली जाते. यामुळे सायंकाळनंतर बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. भेंडीबाजार, खडेबाजार, दरबार गल्ली तसेच विविध बाजारपेठा रमजानसाठी दुपारनंतर सज्ज होत असून सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळेला खरेदीला उधाण येत आहे चिकन इतर नॉन व्हेज पदार्थ चाखण्यासाठी रात्रभर मुस्लिम बांधव खडे बाजार मध्ये गर्दी करतांना दिसतात.
बाजारपेठेत अत्तर, सेंटबरोबरच विविध खाद्यपदार्थांचा घमघमीत वास दरवळत असून मुस्लीम बांधवातून रमजानच्या निमित्ताने खरेदीला सुरुवात झाली आहे. नुकतेच 11 रोजे पूर्ण झाले असल्याने मुस्लीम बांधव सायंकाळच्यावेळी बाजारपेठांतून फेरफटका मारून खरेदी करताना दिसत आहे. मात्र विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवडय़ात रमजान ईद सणाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्याची शक्मयता व्यक्त केली जात असून या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी विविध साहित्यांचे जणू प्रदर्शनच भरविले आहे.