मतदारांनो, मतदान करणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो हक्क तुम्ही बजावा. तुम्ही स्वयंस्फूर्तीने मतदान कराल, डोळसपणे मतदान कराल, तर एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सदृढ समाज उभारणीसाठी योगदान देणारा लोकप्रतिनिधी तुम्हास मिळेल.
100 टक्के मतदान करावे, यासाठी प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करीत आहे. काही संघ संस्थांनीही या कामाला जुंपून घेतले आहे. याकामी तुम्हीही खारीचा वाटा उचला. तुम्ही स्वतः स्वयंस्फूर्तीने मतदान करा आणि इतरांनीही मतदान करावे यासाठी प्रयत्न करा. असे झाल्यास 100 टक्के मतदानासाठी चाललेल्या प्रशासन आणि स्वीप समितीच्या प्रयत्नांना यश येईलच आणखीन एक चांगला लोकप्रतिनिधी समाजाला लाभेल.
मतदारांनो, मतदान करणे हा तुमचा हक्कच नाही तर एक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा.
मतदानाच्या नावाखाली मिळणाऱ्या सुट्टीचा वापर तुम्ही मतदान न करता,मित्रपरिवारासह सहलीसाठी कराल तर तुम्ही असंस्कृत आणि स्वार्थी व्यक्ती असाल. पण तुमचा हा स्वार्थ, तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य कलुषित करणारे, अंधारात लोटणारे असेल.
तर मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा.