सीमा भागातील मराठी जनतेच्या भावनांच्या अस्मितेच्या मराठी उमेदवारा विरोधात महाराष्ट्र भाजप आणि काँग्रेसचे नेते प्रचार करत आहेत याची नोंद महाराष्ट्रातील जनता घेईल अशी टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुका पूर्वीची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमा भागातील उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपाला शिवसेनेने लक्ष केलंय.
कर्नाटक व्याप्त सीमा भाग महाराष्ट्रात यावं म्हणून आम्ही लाठ्या काठ्या झेलल्या प्रसंगी जेल मध्ये गेलो आणि आजही आम्ही त्याच ताकतीने लढत आहे. असं असताना बेळगाव कर्नाटकात राहिला काय किंवा महाराष्ट्रात राहिला काय ? शेवटी तो भारतातच आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा कडून अपेक्षा काय करणार? असा टोला शिवसेनेचे नेते रावते यांनी लगावला आहे.
रावते हे कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान सीमा भागातील मराठी उमेदवाराला पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रावतेंनी अभिनंदन देखील केलंय. तसंच सीमाभागातील मराठी उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देणाऱ्या भाजपा आणि काँग्रेसच्या भूमिकेची महाराष्ट्रातील जनता नोंद घेईल असा सूचक इशारा देखील रावते यांनी दिलाय.