खानापूर व बेळगाव तालुका समिती बरोबरच आता शहरात सुद्धा एकीची गरज निर्माण झाली आहे. अधिकृत समिती कुणाची हा वाद मिटवून दोन्ही गटाच्या उमेदवारांनी एकत्र येण्याची गरज आहे.
सध्या जनतेची आग्रही मागणी होत आहे. मागीलवेळी एकि झाली म्हणून बेळगाव दक्षिण मधून संभाजी पाटील आमदार होऊ शकले याचा विचार समिती च्या दोन्ही गटांना करावा लागणार आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वसमावेशक, एकास एक उमेदवार देणे गरजेचे असून जशी खानापूर व बेळगाव तालुक्यात एकी चे वारे वाहू लागलेत तशीच एकी शहरातील नेत्यांमध्ये होणे गरजेचे आहे असे विचार दोन्ही मतदार संघातील वेगवेगळ्या भागातील सामान्य जनतेचा कानोसा घेतल्यानंतर ऐकावयास मिळाले.
जनतेला संभ्रमात टाकू नका, तुमचे वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा नसेल तर आमच्या भागात प्रचारास येऊ नका असे सुध्दा विचार काही जेष्ठ मराठी भाषिकांनी बोलून दाखवले.
शनिवार च्या बैठकित सुद्धा एकीचाच सूर युवा कार्यकर्त्यांनी मांडला. इतके दिवस प्रयत्न करूनही नेते एकीला प्रतिसाद देत नाहीत यामुळे युवक भडकले होते.
आत्ता नेते काय करतात याकडे शहरातील समितीप्रेमी नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. नेत्यांच्या भांडणात राष्ट्रीय पक्ष फायदा घेऊ नयेत ही काळजी व्यक्त होत आहे.